राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर शुक्रवारी दुपारी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असून विविधांगी प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, या आंदोलनानंतर भाजपाच्या ट्वीटला उत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

भाजपाचं ट्वीट काय?

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर झालेले आंदोलन चुकीचे आहे. पण गेल्या ५ महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेली वागणुक सुद्धा दुर्दैवी आणि अमानवीय आहे. या काळात १२० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, त्याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. याचबरोबर आजच्या घटनेने गृहमंत्रालयाचे अपयशही समोर आले आहे,” असं ट्वीट भाजपाने केलं होतं.

अमोल मिटकरीचं उत्तर –

“हे बघा लबाडी. अरे वेड्या शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांना चिरडून मारले त्याची जबाबदारी कुणाची? काल दारुडे कसे हल्ल्यात सहभागी होते? ते st कर्मचारी होते का? कुणाच्या इशाऱ्यावर हल्ला झाला हे सांग ना,” असं त्यांनी म्हटलंय.

काल शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाला भाजपा जबाबदार असल्याचं अमोल मिटकरींनी म्हटलंय. हे आंदोलन भाजपाच्या इशाऱ्यावर झालंय, असा रोख अमोल मिटकरींचा होता. या आंदोलनातील आंदोलक हे एसटी कर्मचारी होते का? असा सवालही अमोल मिटकरींनी उपस्थित केला आहे.

Story img Loader