|| इंद्रायणी नार्वेकर
‘बेस्ट’कडे रोख रक्कम हाताळण्याच्या यंत्रणेचा अभाव
मुंबई : ग्राहकांनी भरलेली विजेच्या देयकांची रक्कम व धनादेश हे गेल्या काही दिवसांपासून बेस्टकडे पडून आहे. रोख रक्कम आणि धनादेश बँकेत जमा करण्यासाठी आयआयसीआय बँकेबरोबर केलेला करार संपल्यामुळे बेस्टला रोजच्या रोज ही रक्कम हाताळणे मुश्कील होऊ लागले आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या व्याजावर पाणी सोडावे लागत आहे.
बेस्टकडे दररोज तिकिटांचे पैसे आणि विजेच्या देयकाचे पैसे या मार्गाने रोख रक्कम येत असते. ही रक्कम हाताळण्यासाठी बेस्टने आयआयसीआय बँकेशी दहा वर्षांपूर्वी करार केला होता. रोख रक्कम व धनादेश बँकेत भरण्याचे काम या बँकेमार्फत व्हायचे. मात्र वर्षभरापूर्वी रक्कम हाताळणे शक्य नसल्याचे कारण देत बँकेने हा करार संपुष्टात आणला. त्यामुळे बेस्टच्या परिवहन आणि विद्युत पुरवठा विभागात दररोज जमा होणारी चार ते पाच कोटींची रक्कम कशी हाताळायची, असा प्रश्न बेस्ट प्रशासनासमोर पडला होता. गेल्या वर्षभरात यावर काहीच तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आता टाळेबंदीच्या काळात हा प्रश्न अधिकच बिकट बनला असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
टाळेबंदीच्या काळात बेस्टने कागदी वीजदेयके देण्याचे बंद केले होते. त्यामुळे काही ग्राहकांनीच ऑनलाइन वीज देयके भरली. मात्र आता टाळेबंदी शिथिल केल्यानंतर वीजदेयक भरणा केंद्रांवर रोख रकमेने किंवा धनादेशाद्वारे तीन महिने थकलेले विजेचे देयक भरणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्रावर मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व धनादेश जमा होऊ लागले आहेत.
लाखो रुपयांच्या व्याजावर पाणी
आधीच बेस्टच्या परिवहन विभागातील सुट्ट्या पैशांचा प्रश्न निकाली निघत नसताता आता विद्युत विभागातील रोख रकमेचा प्रश्न बेस्टसमोर उभा राहिला आहे. बेस्टला दर दिवशी साधारण चार ते पाच कोटी रक्कम विजेच्या देयकामार्फत मिळते. केंद्रावर जमा होणारी कोट्यवधीची रक्कम व धनादेश बेस्टच्या कुलाब्यातील रोख विभागात पडून आहेत. त्यामुळे बेस्टचे लाखो रुपयांचे व्याजही बुडत आहे. ही रक्कम व धनादेश घेऊन बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बँकेत तासनतास वेळ घालवावा लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही नाराजी आहे. तसेच या कामासाठी मनुष्यबळही कमी पडू लागल्याचे अधिकारी खासगीत सांगतात.
कर्मचाऱ्यांवरच दबाव
अधिक ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीनेच देकये भरावीत यासाठी आता बेस्ट प्रशासन कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी ग्राहकांचे मोबाइल क्रमांक, ई मेल पत्ता मिळवण्याबाबत कर्मचाऱ्यांना सांगण्यात आल्याचे समजते. याबाबत बेस्टच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी माहिती घेऊ असे सांगितले.