बचत गटांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आयुक्तांची भेट
मुंबई : महिला बचत गटांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची मंगळवारी भेट घेतली. विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या महिला बचत गटांचे प्रश्न सोडविण्याची विनंती त्यांनी आयुक्तांना केली. या संदर्भात अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन अजोय मेहता यांनी त्यांना दिले.
केंद्र सरकारच्या योजनेनुसार पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पोषण आहार उपलब्ध केला जातो. विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याचे काम पालिकेने महिला बचत गटांना दिले आहे. पोषण आहार कुठे, कसा आणि किती बनवावा याबाबत काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. अलीकडेच केंद्र सरकारने पोषण आहाराविषयीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. मात्र नव्या नियमांमधील काही अटी बचत गटांच्या दृष्टीने जाचक ठरत आहेत. पोषण आहार बनविण्यासाठी किती आकारमानाचे स्वयंपाकघर असावे याबाबतची अटही त्यात समाविष्ट करण्यात आली आहे. या अटींचे काटेकोरपणे पालन करणे काही महिला बचत गटांना शक्य होत नाही. पैसे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे महिला बचत गटांसमोर आर्थिक पेच निर्माण होतो.
महिला बचत गटांचे प्रतिनिधी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांचे गाऱ्हाणे पालिका अधिकाऱ्यांकडे अधूनमधून मांडत असतात; परंतु त्यांच्या प्रश्नांकडे कुणीच लक्ष देत नाही.
ही बाब लक्षात घेत महिला बचत गटांचे प्रश्न मांडण्यासाठी अमृता फडणवीस यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयात धाव घेतली. अजोय मेहता यांची भेट घेऊन त्यांनी महिला बचत गटांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. या प्रश्नांबाबत सखोल अभ्यास करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी त्यांना दिले.