मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असली तरी त्यांनी सुरक्षा व्यवस्थेत पायलट वाहन ठेवण्यास नकार दिला आहे.
‘‘मला सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राहायचे आणि वावरायचे आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पायलट वाहन देण्यात येऊ नये,’’ अशी विनंती अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना केली आहे. अमृता फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाहतूक सुरळीत करणाऱ्या पायलट वाहनासह वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान केली आहे.
फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीतही अमृता फडणवीस यांना ही सुरक्षा व्यवस्था होती. मात्र अमृता फडणवीस यांनी सुरक्षा व्यवस्थेतील पायलट वाहन नाकारले आहे. मुंबईतील वाहतुकीची परिस्थिती अतिशय निराशाजनक आहे; पण पायाभूत सुविधा व विकास प्रकल्प पूर्ण झाल्यावर आपल्याला लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.