नवऱ्याने घराबाहेर काढल्यानंतर मुलांच्या उदनिर्वाहासाठी तान्हुल्या बाळाला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमृता साळवी उर्फ आफरीन शेख या तरुणीची शोकांतिका अजूनही सुरूच आहे. तिला जामीन मिळून दोन महिने झाले. परंतु जामीनाची हमी देण्यास कुणीही नसल्याने ती तुरुंगातच  आहे.
मालवणीत राहणाऱ्या अमृता साळवी हिने झुबेर शेख नावाच्या तरुणाशी घरच्यांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला होता. परंतु झुबेर तिला सातत्याने मारहाण करत होता. तिला दोन मुले होती. तिसरा मुलगा झाल्यानंतर नवऱ्याने तिला घराबाहेर काढले. ती आईकडे आसरा मागण्यासाठी गेली असता आईनेही घरात घेतले नव्हते. असहाय्य अवस्थेत रस्त्यावर तीन मुलांसह आलेली अमृता दोन महिला दलालांच्या तावडीत सापडली. त्यांनी तिला बाळ विकण्यास प्रवृत्त केले. ही माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने ‘लोकसत्ता’ने सापळा लावून हा डाव उधळून लावला होता. पैशांसाठी नव्हे तर किमान एका बाळाचे संगोपन नीट होईल या हेतूने अमृता ते बाळ स्वयंसेवी संस्थेकडे विनामूल्य देत होती. परंतु त्या दोन महिला दलाल त्या बाळाचे पैसे घेत होत्या. पोलिसांनी दोन दलालांसह अमृतालाही अटक केली . अमृताची ही शोकांतिका वाचून राष्ट्रीय महिला आयोगानेही अमृताची भेट घेऊन पुनर्वसनाचे आश्वासन दिले .
या प्रकरणात अमृताचा हेतू वाईट नव्हता. यामुळे चारकोप पोलिसांनी तिच्या जामीनाची मागणी केली होती. दोन महिन्यांपूर्वी न्यायालयाने तिला २० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीचा जामीनही मंजूर केला. पण तिला हमीचा हा जामीन देण्यास कुणीच पुढे आलेले नाही. त्यामुळे ती अद्याप तुरुंगात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जयवंत हरगुडे यांनी दिली. आम्ही न्यायलयाकडून जामीन मंजूर करवून घेतला. पण तिला तिची आईपण जामीन द्यायला तयार होत नसल्याचे हरगुडे यांनी सांगितले. याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या निर्मला सांमत प्रभावळकर म्हमाल्या की,  ‘टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स’ या संस्थेचा महिला विभाग अमृताचे समुपदेशन व मदत देण्याचे काम करत होता.
 तिला जामीन मिळवून देण्याबाबत प्रयत्न करू. परिस्थितीमुळे तान्हुले बाळ संस्थेला देण्यास तयार झालेली अमृता आता दोन्ही बाळांपासून दुरावली आहे. सप्टेंबरपासून ती तुरुंगात असल्याने तिच्या दोन बाळांची आणि तिची भेटही झालेली नाही.

Story img Loader