मुंबई : गुजरात सहकारी दूध पणन महासंघ अर्थात अमूल पुण्यातील खेड औद्योगिक वसाहतीत आईस्क्रीम प्रकल्प उभारत आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आईस्क्रीम प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लहान – मोठ्या आईस्क्रीम उद्योगांना मोठ्या व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. अमूलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील खेड औद्योगिक वसाहतीत अमूल आईस्क्रीम प्रकल्प उभारत आहे. सध्या प्रतिदिन ५० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करून आईस्क्रीम निर्मिती केली जाणार आहे. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, आगामी उन्हाळ्यात प्रकल्पातून आईस्क्रीम निर्मिती सुरू होईल. सध्या प्रक्रियेची क्षमता प्रतिदिन ५० हजार लिटर असली तरीही तिचा विस्तार लवकरच दीड लाख लिटर प्रतिदिन पर्यंत होऊ शकतो. अमूल या प्रकल्पासाठी पुणे परिसरातूनच दूध संकलित करणार आहे.
महाराष्ट्रात नाशिक येथे हिंदुस्थान लिव्हरचा आणि नागपूर येथे दिनशॉ कंपनीचा प्रकल्प आहे. या व्यतिरिक्त राज्यात लहान प्रमाणावर शेकडो उद्योग कार्यरत आहे. देशात प्रमुख २० कंपन्या कार्यरत असून, त्यांची उलाढाल तीन हजार कोटींहून जास्त आहे. खेडमधील अमूलच्या प्रकल्पामुळे राज्यात आईस्क्रीम निर्मितीत एक मोठी कंपनी उतरणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायात मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. ऊर्जा, चितळे, गोकूळ, कात्रज, सोनाईसह अन्य अनेक दूधसंघ लहान पातळीवर आईस्क्रीम निर्मिती करतात. पण, राज्यात अशी एकही कंपनी, दूधसंघ नाही, जो मोठ्या प्रमाणावर आईस्क्रीम निर्मिती करतो.
हेही वाचा…बेताल चालकांवर कारवाई, १७ हजारांहून अधिक चालकांना ८९ लाख रुपये दंड
े
अमूलमुळे एकीकडे राज्यात आईस्क्रीम उद्योगाच्या वाढीस चालणार मिळणार आहे. दुसरीकडे लहान आईस्क्रीम उद्योजकांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. शिवाय दूध संकलनातही स्पर्धा निर्माण होणार आहे. सध्या अतिरिक्त दूध उत्पादनामुळे गायीच्या दुधाचा दर २८ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आला आहे. मोठ्या प्रकल्पांमुळे दूध दर टिकून राहिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शीत साखळीचा खर्च टाळण्यासाठी विस्तार
आईस्क्रीम उद्योगात शीत साखळीचा खर्च जास्त आहे. त्यामुळे वाहतूक खर्च टाळण्यासाठी, किरकोळ विक्रेत्यांपर्यंत कमीत कमी खर्चात आईस्क्रीम पोहचविण्यासाठी प्रमुख आईस्क्रीम कंपन्यांकडून देशाच्या विविध भागात प्रकल्प उभारले जात आहेत. पुण्यातून मुंबई सारख्या मोठ्या बाजारपेठेसह दक्षिण आणि उत्तर भारतात वाहतूक करणे सोयीचे असल्यामुळे पुण्यात अमूलचा प्रकल्प होत आहे. अमूलच्या नव्या प्रकल्पामुळे राज्यातील दुग्ध व्यवसायात स्पर्धा वाढणार आहे, असे मत दूध उद्योगाचे अभ्यासक संजय भागवतकर यांनी व्यक्त केले.