मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडय़ांच्या ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला वांद्रे पोलिसांनी नुकतीच अटक केली. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला जामीन मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जी. पी रझाक असे आरोपीचे नाव आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मुंबईतील वांद्रे परिसरात २७ जुलै रोजी एका कार्यक्रमासाठी जात असताना आरोपी रझाक याने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न केला. प्रकरणाची माहिती समजताच पोलिसांनी तातडीने रझाकला अटक केली असून त्याची चौकशी सुरू केली आहे.

आरोपीवर भरधाव वेगाने गाडी चालवून नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलीस मारुती शिंगटे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर वांद्रे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्राथमिक तपासात त्यात कोणताही घातपात नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात जाण्याचा प्रयत्न नव्हता. मी माझ्या कामानिमित्त घरातून निघालो होतो. समोर वाहनांचा ताफा दिसताच मी माझी गाडी मागे ठेवली होती, असे आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले.