रुग्णांची हेळसांड करणाऱ्या रुग्णालयांचा कोविडचा दर्जा काढण्याचा विचार; मृत्यूच्या कारणांचा पालिकेकडून अभ्यास

इंद्रायणी नार्वेकर

मुंबई : दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या कमी झाली तरी दैनंदिन मृतांची संख्या मात्र कमी होत नसल्यामुळे पालिकेने आता रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. दुसऱ्या लाटेत खासगी व पालिकेच्या रुग्णालयांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. एखाद्या खासगी रुग्णालयाकडून रुग्णांच्या प्रकृतीबाबत हेळसांड झाल्याचे आढळल्यास त्या रुग्णालयाचा करोना रुग्णालय म्हणून असलेला दर्जाही काढून टाकण्यात येणार आहे. तसेच गृह विलगीकरणाच्या धोरणातही बदल होण्याची शक्यता आहे.

फे ब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. ही रुग्णसंख्या जूनमध्ये कमी होऊ लागली. मात्र दैनंदिन मृतांची संख्या काही केल्या कमी होत नव्हती. रुग्णांच्या एकू ण संख्येच्या तुलनेत मृत्युदर कमी असला तरी सरासरी दर दिवशी २५ ते ३० रुग्णांचा मृत्यू व्हायचा. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत चार हजारांहून अधिक नागरिकांचा गेल्या सहा महिन्यांत मृत्यू झाला आहे. आता दुसरी लाट ओसरत असताना पालिके ने या मृत्यूमागच्या कारणांचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे. नक्की कोणत्या चुका झाल्या म्हणून मृतांची संख्या वाढली याचा आढावा घेतला जात आहे. त्यात पालिके च्या करोना केंद्रांमध्ये किंवा खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांमध्ये त्रुटी राहिल्या का, धोरणांमध्ये त्रुटी राहिल्या का, याचा अभ्यास के ला जात आहे. एखाद्या विशिष्ट खासगी रुग्णालयाकडून रुग्णांबाबत हेळसांड झाल्याचे आढळून आल्यास त्या रुग्णालयाचा करोना रुग्णालय म्हणून असलेला दर्जा तिसऱ्या लाटेच्या वेळी काढून टाकण्याचाही पालिके चा विचार आहे.

दुसऱ्या लाटेतील मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करताना एखादा रुग्ण बाधित झाल्यापासून घरी किती दिवस होता, त्यानंतर खासगी रुग्णालयात होता का, तिथे किती दिवस होता, घरी प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला का, खासगी रुग्णालयात हेळसांड झाल्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत पालिकेच्या करोना केंद्रांमध्ये दाखल झाला का, याचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच कोणत्या पातळीवर निर्णय चुकल्यामुळे मृत्यू झाला की त्या रुग्णाला सहव्याधी होत्या म्हणून तो दगावला, याचाही अभ्यास के ला जाणार आहे.

गृह विलगीकरणाच्या धोरणात खासगी डॉक्टरांवर जबाबदारी

रुग्ण गृह विलगीकरणात होता आणि मग खूप अत्यवस्थ झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला अशा घटना जास्त असतील तर गृह विलगीकरणाच्या धोरणात तिसऱ्या लाटेदरम्यान बदल होण्याची शक्यता आहे. रुग्ण गृह विलगीकरणात राहणार असेल तर त्याच्या खासगी डॉक्टरांचे संपर्क क्रमांक घेतले जातील. त्यांच्याकडून रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेण्याचा पालिकेचा विचार आहे.

१० फे ब्रुवारी २०२१ रोजीची स्थिती

एकू ण मृत्यू    ११,४००

एकू ण रुग्ण    ३ लाख १३ हजार २०६

 

१४ जुलै २०२१ रोजीची स्थिती

एकू ण मृत्यू    १५,६५४

एकू ण रुग्ण    ७ लाख २९ हजार २५०

 

दुसऱ्या लाटेत सहा महिन्यातील

एकू ण रुग्ण    ४ लाख १६ हजार ४४

एकू ण मृत्यू    ४,१५४

पालिके च्या केंद्रांमधील त्रुटींचा शोध

केवळ खासगी रुग्णालयांच्याच नव्हे तर पालिकेच्या करोना केंद्रांतील कामगिरीचाही अभ्यास के ला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. प्रशासकीय पातळीवर किं वा औषधोपचाराच्या पातळीवर काही कमतरता राहिली का, याचाही विचार केला जाईल. पालिकेच्या केंद्रांमध्ये डॉक्टरांची किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांची किंवा उपचारांमध्ये काही कमतरता होती का, हे तपासून पाहण्यात येईल. तसे आढळल्यास त्यात सुधारणा करता येईल, असेही ते म्हणाले.