मुंबई : लोकलमध्ये जनावरांसारखा प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येते ही बाब लाजिरवाणी आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही नुकतेच बेलापूर येथे झालेल्या अपघातात महिलेला पाय गमावण्याची वेळ आली होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जखमींच्या संख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, गेल्या सहा महिन्यांत लोकलच्या अपघातात दररोज सरासरी सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या सहा महिन्यांत दररोज सरासरी ६ ते ७ जणांचा लोकल अपघातात मृत्यू झाला आहे. जानेवारी ते जून २०२४ च्या अपघाती मृत्यू आणि जखमींच्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे. त्यात रेल्वे रूळ ओलांडताना दररोज सरासरी तीन प्रवाशांचा मृत्यू होतो. तर, धावत्या लोकलमधून पडून दररोज सरासरी तीन प्रवाशांना प्राण गमावावा लागतो. जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेवर ७४२ आणि पश्चिम रेल्वेवर ४४० प्रवाशांचा मृत्यू झाला. सहा महिन्यांत एकूण १,१८२ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात १,०६८ पुरुष आणि ११४ महिला प्रवासी आहेत. जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेवर ८६६ आणि पश्चिम रेल्वेवर ५११ प्रवासी जखमी झाले. असे एकूण १,३७७ प्रवासी जखमी झाले. त्यात १,०७९ पुरुष आणि २९८ महिला प्रवासी आहेत. तर जानेवारी ते जून २०२३ या कालावधीत एकूण १,१९७ प्रवासी जखमी झाले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा – राज्याचा आरोग्य विभागच सलाईनवर, तब्बल २० हजार पदे रिक्त

रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू

गेल्या सहा महिन्यांत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना झाले. दोन्ही रेल्वे मार्गांवर एकूण ५४५ पुरुष आणि ५१ महिला असे एकूण ५९६ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, मध्य रेल्वेर ३६३ आणि पश्चिम रेल्वेवर २३३ प्रवाशांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला.

धावत्या लोकलमधून पडून सर्वाधिक जखमी

गेल्या सहा महिन्यांत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अपघातील जखमीमध्ये सर्वाधिक जखमी हे धावत्या लोकलमधून पडून झाले आहेत. दोन्ही रेल्वेवर एकूण ५४९ पुरुष आणि १५० महिला असे एकूण ६९९ प्रवासी जखमी झाले. तर, मध्य रेल्वेवर ४२३ प्रवासी आणि पश्चिम रेल्वेवर २७६ प्रवासी जखमी झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धावत्या लोकलमधून पडून जखमी होणाऱ्यांची संख्या मध्य रेल्वेवर वाढली आहे. दररोज सरासरी ४० ते ५० लोकल फेऱ्या रद्द होतात. परिणामी मर्यादित लोकल फेऱ्या धावत असल्याने, प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. तसेच गर्दीमय लोकलमध्ये लटकून प्रवास करून अनेक प्रवाशांचा जीव जातो.

हेही वाचा – अपघातापूर्वी मिहीरने मालाड येथून बिअर खरेदी केली, गिरगाव ते सागरी सेतूपर्यंत मिहीरने मोटरगाडी चालवली

अपघात – मध्य रेल्वे – पश्चिम रेल्वे

रुळ ओलांडताना होणारे मृत्यू  –  ३६३  – २३३

धावत्या गाडीतून पडून मृत्यू –  १९५ – ९०

रेल्वे खांब लागून मृत्यू – ०२ – शून्य

फलाट, लोकलच्या गॅपमुळे मृत्यू  – ०४ – शून्य

नैसर्गिक मृत्यू – १३७ – ९१

आत्महत्या – ३४ – १७

(१ जानेवारी ते ३० जूनदरम्यान)

स्रोत – लोहमार्ग पोलीस

मंगळवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात प्रवासी नितीन भोसले (४१) यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे ते जिन्यावर पडले. त्यानंतर कर्तव्यावरील असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला शीव रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या छातीत कळ येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.