मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळातील एका भाडेवसुलीकाराने वसूल केलेली सेवाशुल्काची रक्कम म्हाडाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर लाटल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबई मंडळातील एका कर्मचाऱ्याने केलेला अपहार निदर्शनास आला आहे. मुंबई मंडळाच्या जागतिक बँक प्रकल्पातील भाडेवसुलीकाराने भूभाड्याची बनावट पावती पुस्तिका तयार करून रहिवाशांकडून शुल्कापोटी वसूल केलेल्या लाखो रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जागतिक बँक प्रकल्पातील मिळकत व्यवस्थापकाने बोरिवली पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मुंबई मंडळाने या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
जागतिक बँक प्रकल्पाअंतर्गत आकुर्ला, चारकोप, कांदिवली, गोराई, मालवणी, मुलुंड आदी ठिकाणी वसाहती आहेत. या वसाहतीतील रहिवाशांकडून भूभाडे वसूल करण्याची जबाबदारी भाडे वसुलीकारावर सोपविण्यात आली आहे. भाडेवसूलीकार बाबू बालान्ना म्यातरी भूभाडे वसुलीचे काम करीत होता. म्यातरीने भूभाडे वसूल केल्यानंतर दिलेल्या पावत्या बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याप्रकरणी चौकशी केली असता म्यातरी मागील काही वर्षांपासून भूभाड्याच्या बनावट पावत्या देऊन रहिवाशांकडून अतिरिक्त भूभाडे वसूल करीत असल्याचे निदर्शनास आले. बनावट पावत्या देऊन त्याने म्हाडा आणि रहिवाशांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून म्यातरीविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती जागतिक बँक प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस करीत आहेत. या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून लवकरच त्याच्याविरोधात बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा… घरफोडी करणाऱ्या चोराचा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला
बनावट पावत्याच्या आधारे अनेक रहिवाशांकडून भूभाडे वसूल करण्यात आले आहे. आपली भूभाडे पावती बनावट असेल तर पुढे काय असा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे. पावती बनावट असल्याचे आढळल्यास आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.