मंगल हनवते
मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या खर्चात एका वर्षांत सुमारे चार हजार कोटींची वाढ झाली आहे. या प्रकल्पाचा खर्च २०२२ मध्ये ३३ हजार ४०५ कोटी रुपये होता. तो आता थेट ३७ हजार २७६ कोटी रुपयांवर गेला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) सध्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गाचे काम करीत आहे. ही मार्गिका आतापर्यंत पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, आरे कारशेडचा वाद, वृक्षतोड, विस्थापन-पुनर्वसन आणि तांत्रिक अडचणींमुळे या मार्गिकेला विलंब झाला.
दुसरीकडे, यामुळेच मार्गिकेच्या खर्चात वाढ होताना दिसत आहे. या मार्गिकेचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी रुपये होता. मात्र, हा खर्च वाढून २०२२ मध्ये ३३ हजार ४०५ कोटी रुपयांवर गेला. म्हणजे २०२२ पर्यंत मूळ खर्चात १० हजार २७० कोटी रुपयांनी वाढ झाली. रखडलेल्या कारशेडच्या कामामुळे खर्च वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. आता आणखी चार हजार कोटी रुपयांनी खर्चात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत
- ‘मेट्रो ३’चे काम सध्या वेगात सुरू असून, आतापर्यंत मार्गिकेचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील बीकेसी-आरेदरम्यानचे ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे.
- हा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये पूर्ण होणार असून, दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी -कुलाबा दरम्यानचे काम जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा ‘एमएमआरसी’चा मानस आहे.