मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) सर्वात मोठ्या, तब्बल २४०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) यशस्वीपणे उभारणी करण्यात आली आहे. हा डेक ५-६ बोइंग विमानाइतका जड आहे. इतक्या जड ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकच्या उभारणीचे आव्हान पूर्ण करून एमएमआरडीएने प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… धारावी पुनर्विकासासाठी फक्त एकच निविदा ?

मुंबई ते नवी मुंबई प्रवास सुकर आणि वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएकडून २१.८० किमीच्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू बांधण्यात येत आहे. सागरी सेतू अत्यंत मजबूत करण्यासाठी तसेच काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी एमएमआरडीएने प्रकल्पात अत्याधुनिक अशा ऑर्थोट्रोपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या परदेशी तंत्रज्ञानाचा भारतात पहिल्यांदाच मुंबई पारबंदर प्रकल्पात वापर केला जात आहे. त्यानुसार ३ जानेवारीला पहिला ओएसडी डेक टप्पा २ मध्ये बसविण्यात आला. त्यानंतर १४ जानेवारीला १०.३७ किमीच्या टप्पा २ मध्ये दुसरा आणि ८ फेब्रुवारीला दोन ओएसडी डेक एकत्रित बसविण्यात आले. मेपर्यंत सहा ऑर्थोट्रोपिक स्टील डेकची उभारणी करण्यात आली. आता ऑक्टोबरअखेरीस १४ ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक उभारण्यात आले आहेत. प्रकल्पात एकूण ३८ ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक बसविण्यात येणार आहेत. उर्वरित डेकची उभारणी लवकरच केली जाणार आहे.

हेही वाचा… अंधेरी आरटीओ प्रकल्प अखेर अदानी रिॲल्टीला ! ; महारेरा नोंदणी क्रमांक नसतानाही प्रकल्पाची जाहिरातबाजी ?

सोमवारी १४ वा सर्वात जड डेक पॅकेज १ मध्ये बसविण्यात आला. दरम्यान आतापर्यंत पारबंदर प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नवी मुंबई ते मुंबई अंतर काही मिनिटांत पार करता येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An major milestone in the mumbai trans harbour link project placed 2400 ton deck successfully mumbai print news asj