विमानाच्या विविध भागांचे उत्पादन करण्यामध्ये भारतीय कंपन्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने मुंबई आयआयटीत २०१० मध्ये सुरू करण्यात आलेले ‘राष्ट्रीय एरोस्पेस संशोधन केंद्रात’ विशेष यंत्र गुणवत्ता विभागाची स्थापना करून हे केंद्र अधिक मजबूत करण्यात आले आहे. या केंद्रामुळे विमान उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना संशोधनासाठी अधिक बळकटी मिळणार असून देशातून अधिकाधिक विमानांचे भाग बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विमान उत्पादन क्षेत्रात भारताचा सहभाग वाढावा यासाठी नोव्हेंबर २०१० मध्ये मुंबई आयआयटीने केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि बोइंग कंपनीच्या सहकार्याने ‘राष्ट्रीय एरोस्पेस संशोधन केंद्रा’ची स्थापना केली. या केंद्रात गेल्या पाच वर्षांपासून विविध पातळय़ांवर संशोधन सुरू आहे. देशातील विमानाचे भाग उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्या त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी या केंद्रात मांडतात. या अडचणींवर तोडगा देण्याचे काम हे केंद्र करते. याचबरोबर त्या जोडीला नवीन संशोधनातही केंद्र भर पाडत असते. केंद्रातील संशोधन हे केवळ एकाच कंपनीपुरते मर्यादित न राहता त्याचा फायदा इतर कंपन्यांनाही व्हावा या दृष्टीनेच संशोधन करत असल्याचे केंद्राचे प्रमुख असीम तिवारी यांनी सांगितले.
विमानाचे उत्पादन एक कंपनी करीत असली तरी त्याला सुटे भाग पुरविण्याचे काम मात्र इतर अनेक कंपन्या करत असतात. यात देशातील काही कंपन्यांचाही समावेश आहे. मात्र हे प्रमाण खूपच कमी असून ते वाढण्याच्या दृष्टीने संशोधनाचे काम या केंद्रामार्फत केले जात असल्याचेही ते म्हणाले. केंद्रातून आत्तापर्यंत २२ विविध संशोधने पूर्ण झाले असून त्याचे स्वामित्व हक्क मिळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही तिवारी यांनी स्पष्ट केले.
शनिवारी या केंद्रात बोइंग संशोधन आणि तंत्रज्ञान या कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. ग्रेग हायस्लोप यांच्या हस्ते अत्याधुनिक तंत्र गुणवत्ता विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागाच्या माध्यमातून केंद्रातील संशोधनाला मोठी चालना मिळेल, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या वेळी बोइंग इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रत्युश कुमार, आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार एच. के. मित्तल उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा