रेल्वे पोलीस फोर्सचे एएसआय रवींद्र सानप आणि मोटरमन यांनी जीव देण्यासाठी निघालेल्या एका महिलेला अक्षरशा मृत्यूच्या तोंडातून परत आणल्याची घटना घडली आहे. मुंबईतील भायखळा रेल्वे स्टेशनवर हा थरारक प्रसंग घडला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे प्रवाशांना मात्र हा प्रसंग पाहून धस्स झाले.
या थरारक घटनेचा व्हिडीओ आरपीएफने ट्वीट केला असून, आम्ही सर्वांना विनंती करत आहोत की, “कृपया असं पाऊल उचलू नका. आपल्याला आपल्याला फक्त एकच आयुष्य मिळते, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. असा संदेशही सोबत दिला आहे.”
महिला जेव्हा आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरून लोकलच्या दिशेने धावत सुटली होती. तेव्हा रेल्वे स्थानकावर उपस्थित प्रवासी आरडाओरड करून तिला थांबण्यास सांगत होते. मात्र तरी देखील ती महिला समोरून येणाऱ्या रेल्वेच्या दिशेने धावत होती, रेल्वे अगदी काही फुटांवर आल्यानंतर सर्वांना आता ही महिला रेल्वेखाली जाणार असंच वाटले. मात्र तितक्यात आरपीएफचे एएसआय यांनी धावत जाऊन तिला रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केले. सुदैवाने लोकलने देखील ब्रेक लावला होता. म्हणून मोठा अनर्थ टळला. यानंतर रेल्वेस्थानकातील काही प्रवासी देखील महिलेच्या दिशेने धावले. अशा प्रकारे ही महिला अक्षरशा मृत्यूच्या तोंडातूनच बाहेर आल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.