विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त दोन रिक्त जागांवर काँग्रेसने अनंत गाडगीळ आणि पीपल्स रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांची नियुक्ती केली आहे. गेली दहा वर्षे प्रयत्नशील असणाऱ्या गाडगीळ यांना अखेर दिल्लीने न्याय दिला.
काँग्रेसच्या वाटय़ाला सहा जागा येणार असताना वादात चारच जागांवरील नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. दोन जागांवरून पक्षात बरीच चढाओढ सुरू होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाठिंबा देण्याच्या बदल्यात आमदारकी देण्याचे आश्वासन कवाडे यांना देण्यात आले होते. पहिल्या यादीत नाव नसल्याने कवाडे नाराज झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी विदर्भात कवाडे यांची मदत आवश्यक असल्याने त्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर संधी देण्यात आली.
पक्षाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांचे पुत्र अनंत गाडगीळ यांना खासदारकी किंवा आमदारकी देण्याचे आश्वासन वारंवार पक्षनेतृत्वाने दिले होते. पण पक्षाकडून विचार होत नसल्याने गाडगीळ मध्यंतरी रुसूनही बसले होते. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी गाडगीळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गाडगीळ यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्याने जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांला संधी मिळाली आहे.
भाजपने प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि निर्मला  सीतारामन या तीन प्रवक्त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. काँग्रेसने राष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडणाऱ्या गाडगीळ यांना आमदारकी दिली आहे.

Story img Loader