मुंबई: गरीबांची यंदाची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे फडणवीस सरकारने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी नाममात्र दरात रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्याचा निर्णय घेतला होता. रेशन दुकानांवर राज्य सरकारच्यावतीने आनंदाचा शिधा अशी जाहिरात करणारे फलकही झळकवण्यात आले आहेत. मात्र दिवाळी तोंडावर आली तरी दुकानांमध्ये अद्याप या वस्तू उपलब्ध न झालेल्या नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘लम्पी’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली करणार का?; उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा

राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच रेशन दुकानांवर शिधा देण्याची घोषणा केली. दारिद्रय रेषेखालील सुमारे दीड कोटी कुटुंबांना १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल या वस्तू प्रत्येक एक किलो देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दिवाळी तोंडावर आली तरी या योजनेतील धान्य व साहित्य दुकानदारांना अद्याप मिळाले नसल्याचा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. रेशन दुकानांच्या दर्शनी भागात सरकारच्या या योजनेची जाहिरात करणारे फलक लावण्यात आले आहेत. आनंदाचा शिधा असे नाव देऊन ही जाहिरात करण्यात आली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही ठिकाणी रेशन दुकानांवर जाऊन या योजनेची पाहणी केली. एका दुकानातील दुकानदारांकडून माहिती घेतानाची ध्वनिचित्रफित पेडणेकर यांनी समाजमाध्यमांवर टाकली आहे.

हेही वाचा >>> आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून अभिनेता सचिन जोशी दोषमुक्त

जाहिरात केल्यामुळे नागरिक दुकानावर सामान घेण्यासाठी येत आहेत. मात्र सामानच नसल्यामुळे लोकांना तोंड देताना आमच्या नाकीनऊ येत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. या सामानाची आगाऊ रक्कम आमच्याकडून घेतली आहे मात्र सामान कधी मिळणार याबाबत कोणीही काही सांगत नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. तसेच रवा, चणाडाळ, साखर या सामानाच्या पन्नास किलोच्या गोण्या येणार असून लोकांना आम्ही एक एक किलोचे वाटप करायचे आहे मग त्यासाठी पिशव्या कुठून आणायच्या असाही प्रश्नही दुकानदारांनी उपस्थित केल्याचे या ध्वनिचित्रफितीत दिसत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anandacha shidha yojana the ration shops do not have grains disputes shopkeepers and customers mumbai print news ysh