सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे आणि शेखर बजाज यांचे पुत्र अनंत बजाज यांचे निधन झाले आहे. अनंत बजाज हे बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक होते. ते ४१ वर्षांचे होते. शुक्रवारी संध्याकाळी अनंत बजाज यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अनंत बजाज यांच्यामागे त्यांची आई, बहिण, पत्नी आणि मुलगा असे कुटुंब आहे.
अनंत बजाज यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राला धक्का बसला आहे. अनंत बजाज यांचा जन्म १८ मे १९७७ ला मुंबईत झाला. त्यांनी हसाराम रूजुमल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर एस. पी. जैन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९९९ मध्ये त्यांनी बजाज इलेक्ट्रिकल्समध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून सुरूवात केली. रांजणगावमध्ये २००१ मध्ये कंपनीचा एक मोठा प्लांट उभा करण्यात आला, यामध्ये अनंत बजाज यांचा मोलाचा वाटा होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक हे पद देण्यात आले होते.