पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. यामुळे केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही शिवसेना बाहेर पडणार हे स्पष्ट झाले आहे.
राज्यात गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेशी असलेली युती गेल्या आठवड्यात भारतीय जनता पक्षाने तोडली. भाजपने छोट्या घटक पक्षांना सोबत घेऊन स्वतंत्रपणे महायुती करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. भाजपने युती तोडल्यानंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेले अनंत गीते राजीनामा देणार का, असा प्रश्न पुढे आला होता. मात्र, शिवसेनेकडून त्यावर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. भाजपने युती तोडल्यानंतर अनंत गीते तात्काळ दिल्लीतून मुंबईत परतले होते. या सगळ्या घडामोडी घडत असताना रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अनंत गीतेंनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
मुंबईमध्ये सोमवारी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी मोदी भारतात परतल्यावर अनंत गीते त्यांची भेट घेतील आणि मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे स्पष्ट केले. मुंबई महापालिकेतही भाजपसोबतची युती तुटणार का, या प्रश्नाला उत्तर देताना मी शांतपणे सर्व निर्णय घेत असतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा