भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा १२ जुलै रोजी विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या या लग्नसोहळ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा पार पडला असला तरी अद्यापही विवाह सोहळ्यातील काही कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी रिसेप्शन पार पडलं.
अंबानीच्या लग्नसोहळ्यात बॉम्ब फुटणार अशा पद्धतीची धमकीची पोस्ट सोशल मीडियावर केल्याप्रकरणी मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी एका अभियंत्याला अटक केली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात बॉम्बची धमकी दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आज एका ३२ वर्षीय अभियंत्याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा : अंबानींच्या लग्नात बॉम्ब ठेवल्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने यंत्रणा सतर्क
दरम्यान, या अभियंत्याची चौकशी सुरु करण्यात आली असून विरल शाह असे आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. हा वडोदरा येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आज सकाळी आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमधील त्याच्या राहत्या घरातून अटक केली. यानंतर आता आरोपीला मुंबईला आणलं जाणार आहे. दरम्यान, ही पोस्ट FFSFIR नावाच्या अकाऊंटवरून करण्यात आली होती.
पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “माझ्या मनात एक असा विचार येत आहे की अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट झाला तर अर्धे जग उलटेल. एका पिन कोडमध्ये ट्रिलियन डॉलर्स”, अशी धमकी सोशल मीडियावर पोस्ट करत देण्यात आली होती. दरम्यान, यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी लग्नाच्या कार्यक्रमात आणि आसपासच्या सुरक्षा वाढवली होती. आता धमकीची ही पोस्ट सोशल मीडियावर केल्याप्रकरणी एका अभियंत्याला गुजरातमधून पोलिसांनी अटक केली आहे.