आर्यन खान आणि मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांनंतर आता अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या निशाण्यावर आहे. अनन्या पांडेच्या घरी आज सकाळी एनसीबीनं छापा टाकून तपासणी केल्यानंतर तिला दुपारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. संध्याकाळी ४ वाजता एनसीबीच्या कार्यालयात गेलेली अनन्या ६ वाजता बाहेर पडली. त्यामुळे दोन तास चौकशी झाल्यानंतर देखील अनन्याला उद्या पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. उद्या सकाळी ११ वाजता अनन्याला एनसीबीनं पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आहे.

गुरुवारी एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी शोधमोहीम राबवली. अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले. अहवालानुसार, पथकाने अनन्याच्या घरातून काही वस्तू देखील घेतल्या आहेत. “संशयित आणि साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावले जाते. एखाद्याला चौकशीसाठी बोलावणे याचा अर्थ असा नाही की तो आरोपी आहे”, अशी प्रतिक्रिया एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे नेमकी अनन्याची चौकशी कोणत्या दिशेनं जात आहे, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे.

२२ वर्षीय अनन्यानं २०१९ साली बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून अनन्या स्टार सर्कलमध्ये वावरू लागली आहे. २ ऑक्टोबरला कार्टेलिया क्रूजवर टाकलेल्या छाप्यामध्ये एनसीबीनं अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपीच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव समोर आलं आहे. त्या संदर्भात तिची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे.

अनन्या पांडे आणि आर्यन खान हे स्टारकिड्सच्या पार्ट्यांमध्ये अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. आर्यन खानची बहीण सुहाना खान आणि अनन्या पांडे हे चांगले मित्र असल्याची देखील माहिती मिळ आहे. एकीकडे आर्यन खान ८ ऑक्टोबरपासून तुरुंगात असताना दुसरीकडे अनन्या पांडेची देखील चौकशी एनसीबीनं सुरू केली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान जामीन नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

Story img Loader