साडेबारा टक्के योजनेतील भूखंड मिळावेत, यासाठी बोगस कागदपत्र सादर करून करोडो रुपये किमतीचे भूखंड लाटण्याच्या तयारीत असणाऱ्या ४७ फाइली सिडको प्रशासनाने रद्द केल्या असून या फाइलींमुळे २१ हजार ६७० चौरस मीटर क्षेत्रफळ सिडकोच्या हातून जाणार होते. सिडकोला ही जमीन वाचवण्यात यश आले आहे. हे भूखंड जारी झाले असते तर त्यांची सरासरी किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे २१० कोटी रुपयांपर्यंत गेली असती अशी चर्चा आहे.
सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेतील सर्व फाइल्सचे सध्या स्कॅनिंग सुरू आहे. सप्टेंबर, १९९४ मध्ये सुरू झालेली ही योजना सध्या अंतिम टप्प्यात आहे. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी हे स्कॅनिंग आणि त्याच्या वितरणाला प्राधान्य दिले आहे. ही छाननी करताना ४७ फाइली बोगस सादर करण्यात आल्याचे आढळले. त्याद्वारे २१ हजार ६७० चौरस मीटर भूखंड सिडकोला द्यावे लागले असते. ठाणे, उरण, पनवेल या तीन तालुक्यांतील या बोगस फाइली  आहेत. एमआयडीसी, जेएनपीटीला गेलेली जमीन ही आपली जमीन असून त्या बदल्यात सिडकोने साडेबारा टक्के योजनेतील भूखंड द्यावेत यासाठी या फाइली सादर करण्यात आल्या होत्या. सिडकोत सध्या या योजनेतील फाइली चार विभागांत वितरित करण्यात आल्या असून ‘ए’ विभागातील पाच फाइलींचे भूखंड उद्या देण्यासारखे आहेत तर अपुऱ्या कागदपत्रांच्या १०० फाइली आहेत. न्यायालयीन वाद, भांडणे यात २४० फाइलीअडकल्या आहेत.