‘व्हीलचेअर’वरील जवानांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. जादुगाराची जादू संपताच टाळ्यांची सलामी दिली जात होती. जादूगाराच्या एकेक करामत या जवानांमध्ये आत्मविश्वास फुलवत होत्या. ‘माईंड मिरॅकल’चे ते प्रयोग जसे थक्क करणारे होते तसेच या जवानांची जिद्दही! कमरेखालील भागात पक्षाघात झालेल्या या जवानांमधील आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती पाहून तो जादुगारही थक्क झाला.
पुण्याजवळील खडकी येथे ‘पॅराप्लेजिक रिहॅबिलेशन सेंटर’ आहे. १९७१ सालच्या भारत-बांगलादेश युद्धापासून ते कारगिलच्या युद्धापर्यंत तसेच अतिरेक्यांविरोधातील वेगवेगळ्या मोहिमांमध्ये गोळीबारात तसेच बॉम्बस्फोटात गंभीर जखमी होऊन कमरेखालील भागात पक्षाघात झालेल्या जवानांसाठी खडकी येथे सेंटर उभारण्यात आले आहे. दिवंगत राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांच्या हस्ते १९७४ मध्ये या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. अपंगत्त्व आल्यामुळे सैन्यातून निवृत्त झालेले ८२ जवान या ठिकाणी राहात असून या जवानांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या जवानांसाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडूनही मनोरंजन तसेच आत्मविश्वास जागृत करणारे कार्यक्रम राबविण्यात येतात. अलीकडेच सचिन तेंडुलकर यानेही या संस्थेला भेट दिली होती. पुण्यातील ‘विश्व जागृती मिशन संस्थे’च्या माता कृष्णा कश्यप या गेली अनेक वर्षे या जवानांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करतात. गेल्या शुक्रवारी मुंबईतील ‘मॅजिक अकादमी’चे जादुगार भुपेश दवे यांचा ‘माईंड मिरॅकल’ हा आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या जादुच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॅन्सर रुग्णांसाठी तसेच जवानांसाठी मोफत कार्यक्रम करणाऱ्या जादुगार दवे यांनी ‘माईंड रिडिंग’चे एकापाठोपाठ एक अफलातून प्रयोग केले. तसेच काही प्रयोग या जवानांही शिकवले. व्हिलचेअरवरील या जवानांकडूनच खरेतर आत्मविश्वास शिकण्यासारखा असल्याचे दवे म्हणाले. या सेंटरचे प्रमुख कर्नल मुखर्जी तसेच मेडिकल ऑफिसर महेश वाघमारे यांच्या पुढाकाराने अनेक जवानांसाठी उपक्रम राबविण्यात येतात.