आई- वडिलांसह गणपती दर्शनासाठी आलेली ऐश्वर्या धुळे (११) रेल्वेस्थानकावरील गर्दीमुळे एकटीच गाडीत चढली आणि आई-वडील खालीच असताना गाडी सुटली. मुलगी हरवल्याचा आक्रोश करणाऱ्या पालकांना पाहून पोलिसांनी लागलीच सूत्रे हलवली आणि हरवलेली ऐश्वर्या अवघ्या अध्र्या तासात
सापडली.
ऐश्वर्या आपल्या आईवडिलांसह कर्जतहून गणपती पाहायला रविवारी मुंबईत आली होती. सायंकाळी दादर रेल्वेस्थानकावरून बोरिवलीच्या गाडीत चढत असताना गर्दीच्या धक्काबुक्कीत ऐश्वर्या गाडीत चढली पण आईवडील खालीच राहिले. आपली छोटी मुलगी मुंबईच्या लोकलमध्ये एकटीच हरवली हे पाहून तिच्या पालकांनी आक्रोश सुरू केला. रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी हे नेमके या वेळी त्याच फलाटावर होते. त्यांनी गोंधळ पाहून चौकशी केल्यावर त्यांना झाला प्रकार समजला. त्यांनी लागलीच सूत्रे हलवत बोरिवलीपर्यंतच्या सर्व स्थानकांवर मुलीचे वर्णन आणि गाडीची उद्घोषणा करायला लावली आणि प्रत्येक स्थानकावरील पोलिसांना ऐश्वर्याच्या शोधासाठी कामाला लावले.
अध्र्या तासात ऐश्वर्या ही वांद्रय़ात पोलिसांच्या ताब्यात सुखरूप असल्याचा निरोप आला आणि तिच्या पालकांनी जीव भांडय़ात पडला. पोलिसांच्या रूपात त्यांना रविवारी दु:खहर्ताच भेटला.

Story img Loader