* ‘गावाकडले जीवन’ ,‘माझे स्वप्न’ या विषयांवरील चित्रांचे प्रदर्शन
* प्रदर्शनाचे उद्घाटन केले अवघ्या चार वर्षांच्या समीरने
* प्रदर्शनातल्या चित्रांची विक्रीही करणार
चित्रकला आणि अन्य उपयोजित कलांसाठी प्रसिद्ध असलेल्या जे. जे. स्कूल आर्टस् महाविद्यालयाच्या वास्तूत  चित्रांचे प्रदर्शन भरणे ही बहुमानाची आणि प्रतिष्ठेची बाब आहे. हे भाग्य मुंबईतील विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये असलेल्या मुलांच्या नशिबी आले. बुधवारी प्रदर्शनाचे उद्घाटन होताच या मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे झाड फुलले.
निमित्त होते ते नवजीवन सेंटर आणि मुंबईतील विविध बारा सामाजिक-स्वयंसेवी संस्थांमधील मुलांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या सहकार्याने याच संस्थेच्या वास्तुत ‘सौं कहानिया’ या नावाने भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘वात्सल्य फाऊंडेशन’च्या समीर अन्सारी या चार वर्षांच्या मुलाच्या हस्ते झाले. या वेळी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, ‘नवजीवन सेंटर’चे विश्वस्त उन्नन नयनन हे उपस्थित होते.
जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांनी सांगितले की, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची गोडी रुजवली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्याना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आम्ही या उपक्रमासाठी मदत केली.
तर नवजीवन सेंटरच्या प्रकल्प समन्वयक डॉली जेम्स म्हणाल्या की, शंभर मुलांची चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली असून मुलांनी पहिल्यांदाच कॅनव्हासवर चित्र रेखाटले आहे. या मुलांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यात जे. जे. कला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी या मुलांना मार्गदर्शन केले. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रत्येक चित्राचे किमान मूल्य पाच हजार रुपये निश्चित करण्यात आले असून विकल्या गेलेल्या चित्राची रक्कम त्या मुलाला देण्यात येणार आहे.
चित्रांसाठी मुलांना ‘गावाकडले जीवन’ आणि ‘माझे स्वप्न’ असे दोन विषय देण्यात आले होते. मुलांनी आपापल्या भावविश्वातून हे विषय कागदावर उतरवले आहेत. श्रद्धानंद महिला आश्रमातील इयत्ता ११वीत शिकणारी धनश्री शिवदास हिने सांगितले की, मला मोठेपणी मॉडेल व्हायचे असून ती संकल्पना मी चित्रातून व्यक्त केली आहे. तर नवजीवन केंद्राच्या किसन व अविनाश म्हणाले की, जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् सारख्या प्रतिष्ठीत संस्थेच्या वास्तूत आमच्या चित्रांचे प्रदर्शन भरले ही बाब आमच्याासाठी खूप आनंददायी आहे. या निमित्ताने आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.
प्रदर्शन येत्या ३० डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वासाठी खुले आहे. प्रदर्शनात आदित्य बिर्ला सेंटर, अपने आप वुमेन्स कलेक्टिव्ह, आशा सदन, बाल आशा ट्रस्ट, ड्रिम्स इंडिया, ओअॅसिस् इंडिया, सलाम बाल ट्रस्ट, श्रद्धानंद महिला आश्रम, स्नेहसागर, सोना सरोवर ट्रस्ट, वीसान ट्रस्ट, गुड शेपर्ड कन्व्हर्ट आदी संस्थांच्या मुलांची चित्रे मांडण्यात आली आहेत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा