मांजर, अर्थात वाघाची मावशी आडवी गेली की आपल्यापैकी अनेकजण नाके मुरडतात. हीच वाघाची मावशी जर एखाद्या संकटात सापडली तर अनेकांच्या मनात भूतदया वगैरे निर्माण होते आणि मग सुरू होते तिच्या सुटकेसाठीची धडपड. तर अशीच धडपड मालाड पश्चिमेतील स्कायवॉक या इमारतीच्या रहिवाशांना मंगळवारी रात्री करावी लागली. त्यासाठी अग्निशमन दलालाही कामाला लावण्यात आले.
स्कायवॉक ही मालाड पश्चिमेतील गगनचुंबी इमारत. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या हिनल मेहता यांनी एक मांजर पाळली आहे. मंगळवारी रात्री मेहता कुटुंबीय टीव्ही पाहण्यात दंग असताना त्यांचा डोळा चुकवून मांजराने सातव्या मजल्याकडे धाव घेतली.  भिंतीवरून चालत ती सातव्या मजल्यावर पोहोचली खरी पण परतीचा मार्गच विसरली! मग सुरू झाला सुटकेसाठीचा आक्रोश. रात्री साडेअकरा वाजता मांजराच्या ओरडण्याने इमारतीतील सर्वच रहिवासी गोळा झाले. बघता बघता लोकांची गर्दी वाढली. मांजराच्या सुटकेसाठी चर्चा सुरू झाली.
दरम्यान कोणीतरी अग्शिमन दलाला मांजर अडकल्याची वर्दी दिली. अग्निशमन दलानेही तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. मात्र, त्यांची यूएलपी शिडी केवळ तिसऱ्या मजल्यापर्यंतच पोहोचत होती. त्यांच्या दिमतीला मालाड पोलीस ठाण्याचे पोलिसही आले. त्यांनीही मांजराच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. मांजर नेमकी कुठे फसली आहे, हे पाहण्यासाठी मोठा टॉर्च मागविण्यात आला. त्याच्या प्रकाशझोतात मांजरीचा शोध सुरू झाला. गर्दीमुळे मांजरही गोंधळले होते. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर दोन अग्निशमन अधिकारी आणि १४ अग्निशमन कर्माचाऱ्यांनी वाघाच्या मावशीची यशस्वी सुटका केली. आपल्या लाडक्या मांजरीला सुरक्षित पाहून मेहता कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मालाड अग्निशमन विभागाचे अधिकारी सी. आर. पवार यांनी या मोहिमेत भाग घेतला. ते म्हणाले की, पाळीव प्राणी बऱ्याचदा अडकतात आणि आम्ही त्यांची सुटका करतो. पण या मांजरीची सुखरूप सुटका करणे हे मोठेच दिव्य होते. पोलीस आणि इमारतीच्या रहिवाशांनी आम्हाला मोठी मदत केली आणि आम्ही त्या मांजरीला वाचवू शकलो.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा