केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी आज(शुक्रवार) दक्षिण मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपाने आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी सुरू केलेल्या ‘लोकसभा प्रवास’ या संकल्पनेबाबत माहिती दिली. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती.
नारायण राणे म्हणाले, “लोकसभा प्रवास ही भाजपाची नवीन संकल्पना ही आम्हा सर्व केंद्रीयमंत्र्यांना, ज्या मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपाचा पराभव झाला. अशा देशभरातील १४४ जागा आहेत, त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी दोन मतदारसंघ देऊन, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तिथला खासदार भाजपाचा व्हावा, म्हणून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी हा प्रवास आहे. तो प्रवास करत मी दक्षिण गोव्यावरून दक्षिण मुंबईत आलोय, हा माझा दुसरा दिवस आहे.”
हेही वाचा : Andheri East Bypoll – उद्धव ठाकरेंचा सावध पवित्रा; संदीप नाईक यांचाही उमेदवारी अर्ज दाखल
तर “दक्षिण मुंबईत भाजपाचाच खासदार असणार आणि मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.” असंही राणेंनी यावेळी म्हटलं.
हेही वाचा : रमेश लटके असते तर आज ते शिंदे गटात असते; उद्धव ठाकरेंनी उगाच बडबड करू नये – नारायण राणे
याशिवाय सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणेंनी रमेश लटकेंचा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून अपमान झाला होता, असे म्हटले आहे. यावरही नारायण राणेंनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे म्हणाले, “नितशे राणे काय म्हणाले हे मला नेमकं माहीत नाही, माझं याबाबत त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. पण मला एवढी माहिती होती की रमेश लटके असते तर आज शिंदे गटात असते.” तसेच, अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय होईल. असा विश्वासही राणेंनी यावेळी व्यक्त केला.