अंधेरी पूर्व येथील विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं. रविवारी राज यांनी ट्वीटरवरुन शेअर केलेल्या पत्रानंतर पवार यांनीही अशाच पद्धतीने आवाहन केल्यानंतर यासंदर्भात काँग्रेसने वेगळीच शंका उपस्थित केली आहे. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना या पत्रांचा संबंध भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीशी जोडला आहे. सूचक पद्धतीने पटोले यांनी पडद्यामागे राष्ट्रवादी आणि भाजपाची ही खेळी तर नाही अशा आशयाचं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी, सत्तेत बसून भाजपा घारणेरडं राजकारण करत आहे,” असा आरोप केला आहे. “एकीकडे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना बीसीसीआयच्या निवडणुकीसंदर्भातील जी काही प्रक्रिया सुरु आहे ते देश बघतोय. जनता बघत आहे,” असं म्हटलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आशिष शेलार आणि शरद पवार यांच्या गटाने एकत्र येत एक पॅनल उभं केल्याच्या दिशेने पटोले यांच्या टीकेचा रोख होता.

राज ठाकरे आणि शरद पवार यांनी अंधेरीमधील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकाच दिवशी भाष्य केल्यावरुनही पटोलेंनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. “एकच दिवशी दोन मंत्र्यांचं पत्र आणावं बिनविरोध निवडणुकीचं तर यामागे कुठेतरी बीसीसीआयचं राजाकारण लपलेलं नाही ना असाही प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होऊ लगाला आहे,” असं पटोले म्हणाले. “निवडणूक बिनविरोध झाली तर आम्हाला त्याचा कुठलाही विरोध करायचं कारण नाही,” असंही पटोले यांनी स्पष्ट केलं. मात्र अचानक ही निवडणूक बिनविरोध करण्यावरुन सुरु झालेल्या चर्चेबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?
अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या ऋुतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे. लोकप्रतिनिधींचे निधन झाले व त्यांच्या कुटुंबातील कोणी पोटनिवडणूक लढवीत असल्यास शक्यतो निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा असल्याचे सांगत पवार यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडली. तर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रद्धांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी हा निर्णय सुसंगत ठरेल. यामुळेच भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नव्हता याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. तसेच विधानसभेचा दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असल्याने आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला संधी द्यावी, अशी विनंतीही पवार यांनी केली.

राज ठाकरेंनी काय म्हटलं?
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेत, भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली. राज यांनी मात्र भाजपाची विनंती अमान्य करीत उलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती करीत भाजपाची कोंडी केली आहे. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असे आवाहन केले. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुख पदापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आमदार होण्याने रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखरीच शांती मिळेल. यामुळेच भाजपाने ही निवडणूक लढवू नये व त्यांच्या पत्नी निवडून येतील असे पाहावे, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.