९५८ कोटींचा प्रकल्प तीन कंपन्यांकडून तीन टप्प्यांत
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्वदरम्यानच्या १६.५ किमी लांबीच्या उन्नत मेट्रो-७ प्रकल्पाचे काम तीन कंपन्यांना देण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यसमितीने घेतला आहे. त्यानुसार ९५८.३७ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होईल.
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्वदरम्यानच्या १६.५ किमी लांबीच्या मेट्रो-७ प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील कार्यसमितीने आज मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात अंधेरी पूर्व, शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद आणि न्यू अशोक नगर या पाच स्थानकांचे व त्या दरम्यानच्या उन्नत मेट्रो ३४८.३० कोटी रुपये खर्चाचे काम मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. या कंपनीस देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील आरे, दिंडोशी, पठाणवाडी, पुष्पापार्क, बाणडोंगरी, महिंद्रा कंपनी या सहा स्थानकांचे काम मे. जे कुमार कंपनीस देण्यात आले असून त्याची किंमत ३६०.२१ कोटी असेल. तसेच मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा आणि दहिसर पूर्व या पाच स्थानकांचे काम एनसीसी लि. या कंपनीस देण्यात आले असून त्याची किंमत २४९.८६ कोटी आहे.