मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेने ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करावा असा आदेश दिला आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना द्यावे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा>>> “उद्धव ठाकरेंची कोंडी करून शिवसेना पक्षालाच…”, किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटावर आरोप; म्हणाल्या..
मी सकाळीच सांगितले होते की, मुंबई महानगरपालिका तोंडावर आपटणार आहे. मुंबई पालिकेला स्वायत्तता आहे. त्यामुळे कोणाच्यातरी दबावाला बळी पडून आपले हसे करून घेऊन ये, असे आम्ही अगोदरच सांगितले होते. मुंबई उच्च न्यायालयाने तेच अधोरेखित केले आहे. न्यायालयाने ऋतुजा लटके यांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
न्यायालयाने काय आदेश दिला ?
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मुंबई पालिकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालिकेला माझा राजीनामा मंजूर करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका लटके यांनी दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मुंबई पालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करावा. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांना याबाबतचे पत्र द्यावे, असा आदेश न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिला आहे.