अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पार्टीने माघार घेतल्याची घोषणा केली आहे. अत्यंत चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता असलेल्या या मतदारसंघामध्ये आता ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. या निर्णयानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरु होते की काय असं चित्र निर्माण झालं आहे. भाजपाने उमेदवार मागे घेण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्वीटवरुन उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्याची विनंती आपल्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्यांचं ट्वीट करुन म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Andheri Bypoll: “…त्यामुळं त्यांनी चांगला विचार केला असावा”; भाजपाने माघार घेतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर माघार घेतल्याची घोषणा दुपारी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या घोषणेबरोबरच राजकीय प्रतिक्रियाचा पाऊस पडू लागला. त्यातच लटकेंविरोधात उमेदवार देऊ नये असं पत्र कालच मुख्यमंत्री शिंदेंना पाठवणाऱ्या सरनाईक यांनीही ट्वीटरवरुन यासंदर्भातील पहिली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानले आहेत. शिंदेंनी भाजपाला आपलं पत्र वाचून उमेदवार न देण्याची विनंती केल्याचा दावा सरनाईक यांनी ट्वीटमधून केला आहे.

नक्की वाचा >> ग्रामपंचायत निवडणूक: BJP पहिल्या तर NCP चौथ्या स्थानावर असा प्रश्न विचारताच अजित पवार चिडून म्हणाले, “तुम्हाला कसं…”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी लिहिलेल्या पत्राचा मान ठेवून तुम्ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंधेरी येथील पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची विनंती केलीत यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार,” असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. तसेच याच ट्वीटमध्ये त्यांनी, “महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे जतन करणारे तुमच्यासारखे शिलेदार आहेत याचा मला अभिमान आहे,” असंही म्हटलं आहे. कालच सरनाईक यांनी रमेश लटके यांच्या मैत्रीचा संदर्भ देत लिहिलेल्या भावनिक पत्रामधून मुख्यमंत्री शिंदेंना ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी यासंदर्भातील मागणी केली होती.

भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रदेश सुकाणू समितीतील काही नेते बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही भाजपा नेत्यांनी चर्चा केल्यावर आणि दिल्लीत पक्षश्रेष्ठींची परवानगी घेतल्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली.शिवसेनेतील फुटीनंतर ही निवडणूक अतिशय अटीतटीची होईल, अशी अपेक्षा होती. निवडणूक लढविणार असल्याने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आणि शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठविले गेले. ठाकरे व शिंदे गटाला निवडणुकीपुरती दोन स्वतंत्र पक्षनावे व चिन्हे मिळाली.

भाजपच्या दबावामुळे शिंदे गटाने केलेल्या या हालचालींमुळे जनमानसात नाराजीचे वातावरण निर्माण झाले व ठाकरे गट आक्रमक झाला. शिंदे गटाने ठाकरे गटाच्या उमेदवार ॠतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न फसल्यावर त्यांचा महापालिका सेवेचा राजीनामा तांत्रिक मुद्द्यावर आयुक्तांवर दबाव आणून मंजूर करणे लांबविण्याचे प्रयत्न झाले. त्यातही उच्च न्यायालयाने दणका दिल्याने युतीची पंचाईत झाली होती. या सर्व नाट्यानंतरही लटकेंनी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने माघार घेतली.