राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार नसणार आहे. तर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट असणार आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांच्या गटाने सध्याची राजकीय परिस्थी पाहता सावधतेचा पवित्रा घेत आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्यासोबतच आता संदीप नाईक यांनीही ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे.
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या निर्णयामागे काय कारण आहे, याबाबत अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांच्यसोबत ऋतुजा लटके यांचीही उपस्थिती होती.
अनिल परब म्हणाले, “हा नियमचं असतो. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांनी अर्ज दाखल केला आहे. परंतु आपल्या आयोगाचे नियम आहेत. ज्यामध्ये शिवसेना ए आणि बी फॉर्म भरते, त्यामध्ये ही तरतूद असते. की जो पहिला उमेदवार अधिकृत ठरलेला आहे. त्या उमेदवाराने समजा काही कारणास्तव अर्ज मागे घेतला किंवा त्यांचा फॉर्म जर बाद झाला. तर शिवसेनेचा दुसरा अधिकृत उमेदवार म्हणून ज्याचं नाव त्या फॉर्मध्ये लिहिलेलं असतं. त्याला शिवसेनचा अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं जातं. म्हणून शिवसेनेने संदीप नाईक यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. परंतु ही उमेदवारी ज्यावेळी ऋतुजा नाईक यांचा फॉर्म उद्या तपासणीत मान्य होईल, तेव्हा ही उमेदवारी मागे घेतली जाईल.”
पाहा व्हिडीओ –
याशिवाय “ही निवडणूक आहे, यात आम्हाला लढायचं आहे आणि १०० टक्के महाविकास आघाडीच्या उमेदवार, शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके या विक्रमी मतांनी विजयी होतील. याबाबत आमच्या मनात कुठलीही शंका नाही.” असंही परब यांनी यावेळी बोलून दाखवलं.
संदीप नाईक कोण आहेत? –
संदीप नाईक अंधेरी पूर्वचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निकवर्तीय असून, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. शिवाय ते अंधेरीतील शिवसेनेचे माजी नगरसेवकही आहेत. रमेश लटके यांच्यासोबत ते या मतदारसंघात सक्रिय होते, त्यामुळे त्यांना मतदारसंघाचा चांगला अभ्यास आहे. याशिवाय लटके कुटुंबीयांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. ऋतुजा लटकेंची उमेदवारी राजीनाम्याच्या पेचात अडकली होती तेव्हा ठाकरे गटाकडून संदीप लटकेंचाही विचार केला जात होता, अशीही माहिती समोर आलेली आहे.