मुंबई : अंधेरीतील बहुचर्चित गोपाळकृष्ण गोखले पुलाचे मुख्य बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले आहे. महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूल व पुलाची इतर सर्व अनुषंगिक कामे पूर्ण होत आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. तब्बल अडीच वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची दुसरी बाजू लवकरच सुरू होणार आहे. गोखले पूल धोकादायक ठरल्यामुळे नोव्हेंबर २०२२ मध्ये बंद करण्यात आला होता. त्यानंतर या पुलाच्या बांधकामावरून बराच गदारोळ झाला. पुलाची एक बाजू सुरू करण्याची मुदत वारंवार हुकली. गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्या जोडणीत मोठे अंतर पडले होते. त्यामुळे या पुलाच्या कामाचे हसे झाले होते. अखेर गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाची जोडणी करून एक बाजू फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर पुलाच्या दुसऱ्या बाजूचे काम सुरू झाले. हे काम आता १०० टक्के पूर्ण झाले असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूल सुरू होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून गोखले पूल वाहतुकीस खुला करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी पाहणी केली. या पुलाचे रेल्वे हद्दीतील काम, दोन्ही बाजूचे चढ – उतार मार्ग आणि सी. डी. बर्फीवाला पुलाची जोडणी हे सगळे काम पूर्ण झाले आहे. प्रा. ना. सी. फडके मार्गावरील तेली गल्ली पूल व गोखले पुलाच्या मधल्या भागाच्या कॉंक्रिट कामाचे ‘क्युरिंग’ही पूर्ण झाले आहे. पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाल्यानंतरची उर्वरित कामे सुरू आहेत. अपघात प्रतिबंधक अडथळा (Crash Barrier), ध्वनिरोधक (Noise Barrier), कठडे, रंगकाम, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, विद्युत खांब, दिशादर्शक फलक (Signages) आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत. वाहतूक पोलिसांसमवेत महानगरपालिका अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा नुकताच झाला आहे.

जेव्हीपीडी अंतर्गत काम वेगात

जुहू – विलेपार्ले विकास योजना (जेव्हीपीडी) अंतर्गत उड्डाणपुलाच्या पूर्व दिशेकडील पोहोच रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. बर्फीवाला पूल जेथे उतरतो त्या ठिकाणचा बाजूचा रस्ता (स्लीप रोड) अरूंद आहे. त्यामुळे पोहोच रस्ता पूर्ववत करून वाहतुकीसाठी खुला करावा, जेणेकरून नव्याने कार्यान्वित होणाऱ्या बर्फीवाला पुलाच्या दक्षिण भागातील उतारावरील वाहतूक सुरळीत होईल. जुहू जंक्शन गल्लीपासून वाहनांचे आवागमन योग्य प्रकारे होईल, असेही अभिजीत बांगर यांनी नमूद केले. जुहू गल्ली जंक्शनपासून जुहू – विलेपार्ले विकास योजना (जेव्हीपीडी) कामकाज सुरू राहील. मात्र, त्या ठिकाणी बर्फीवाला पुलावरून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशा रुंदीचा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना अभिजीत बांगर यांनी केली.

विक्रोळी पुलाचे कामही अंतिम टप्प्यात

विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाचीही अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी पाहणी केली. विक्रोळी रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करावे व जेणेकरून उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी नागरिकांसाठी खुला करता येईल यादृष्टीने कामांना वेग द्यावा असे निर्देश बांगर यांनी दिले.

विक्रोळी, कांजूर, घाटकोपरांनाही फायदा

पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणारा हा पूल पूर्ण झाल्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरून पवईकडे जाणाऱ्या वाहनधारकांच्या वेळ आणि इंधनात बचत होणार आहे. तसेच घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटरपर्यंतच्या परिघातील वाहनधारकांनाही या पुलाचा उपयोग होणार असल्याचे अभिजीत बांगर यांनी सांगितले.