मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दोन मार्गिका येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा निर्धार मुंबई महानगरपालिकेने केला आहे. या पुलासाठी रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका या दोन यंत्रणांची कामे एकमेकांवर अवलंबून असून या दोन प्राधिकरणांची एक संयुक्त बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत पुलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम प्रगतीपथावर आहे. रेल्वेतर्फे पुलाचे पाडकाम सुरू आहे. तर नवीन पुलासाठी तुळई बनवून ती बसवण्याचे काम महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई : पदपथांवर दुकानांना परवानगी हे उद्देशाला सुरूंग लावण्यासारखे ; उच्च न्यायालयाची टिप्पणी
ही दोन्ही कामे समांतरपणे सुरू आहेत. या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी नुकतीच पाहणी केली व या कामाचा आढावा घेतला. या कामे जलदगतीने करावी, तसेच यंदा पावसाळ्यापूर्वी दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
गोखले पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणी ही कामे दोन वेगवेगळ्या प्राधिकरणांमार्फत सुरू असून ती एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे या दोन प्राधिकरणांमध्ये समन्वय राखणे आवश्यक आहे. त्याकरीता मंगळवारी या दोन प्राधिकरणांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुलाच्या कामाच्या गतीचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती पी. वेलरासू यांनी दिली. कामाचा क्रम निश्चित करून कालबद्ध पद्धतीने ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई: भेंडीबाजार पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील बहुमजली इमारतींच्या बांधकामाला सुरुवात
रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या पुलाच्या भागाचे पाडकाम सुरू असून मागील दोन महिन्यात ८० मीटरपैकी ३० मीटर पाडकाम रेल्वे कंत्राटदाराने पूर्ण केले आहे. रेल्वेने पूल पूर्ण तोडल्यानंतर महानगरपालिकेला उर्वरित कामाला वेग देता येणे शक्य होईल. रेल्वेच्या हद्दीतील पुलाच्या तुळईचे (गर्डर) काम महानगरपालिकेच्या कंत्राटदारांमार्फत सुरू आहे. तुळईचे भाग तयार करून ते जागेवर आणून जोडले जाणार आहेत. त्यानंतर त्यावर सिमेंट काँक्रिटची जोडणी करण्यात येणार आहे. ही सगळी कामे आधीच्या पाडकामावर अवलंबून आहेत.
या उड्डाणपुलाच्या उत्तर बाजूकडील रस्त्याचे ७० टक्के काम महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. तर दक्षिणेकडील बाजूला पुलाचे पाडकाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्याप या भागाकडे काम सुरू करता आलेले नाही. ३१ मे २०२३ पर्यंत पुलाच्या दोन मार्गिका पूर्ण करून वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे उद्दीष्ट असल्याचेही वेलरासू यांनी सांगितले.