लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी शुक्रवारी दुपारी पाऊणच्या सुमारास फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे उडत होते. मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. पाणीगळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू असून जलवाहिनी फुटल्यामुळे अंधेरी ते दादर परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारपर्यंत या सर्व भागात पाणीपुरवठा बंद राहील किंवा कमी दाबाने होईल.
पवई परिसरात आरे वसाहतीमधील गौतमनगर विभागात शुक्रवारी दुपारी पाऊणच्या सुमारास तानसा मुख्य जलवाहिनी फुटली. १,८०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे फवारे उडत होते. प्रचंड दाबाने पाण्याचे फवारे आजूबाजूच्या परिसरात, वस्त्यांवर आदळत होते. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले. मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्लेचा पूर्व भाग, सांताक्रूझ, वांद्रे, खार परिसर, बेहराम पाडा, वांद्रे रेल्वे टर्मिनस, धारावी, दादर, माहीम येथील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई : लिपिक पदाच्या भरती प्रक्रियेतील अटी वादात, जाचक अटी रद्द करण्याची मागणी
दरम्यान, जल अभियंता खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जलवाहिनीतून होणाऱ्या पाण्याच्या गळतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. त्यानंतर दुरुस्तीचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. दुरुस्तीचे काम चोवीस तास चालणार असून त्यामुळे शनिवारपर्यंत अंधेरी ते दादर आणि भांडुपमधील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पाण्याच्या प्रवाहामुळे घरांचे नुकसान
जलवाहिनी फुटल्यामुळे प्रचंड दाबाने पाणी आजूबाजूच्या वसाहतींमधील घरांवर फेकले जात होते. त्यामुळे या परिसरातील किमान दहा ते बारा घरांचे नुकसान झाले. घरांचे छप्पर उडाले, सामान अस्ताव्यस्त झाले, तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरले.