Marathi Conflict in Andheri Dmart : महाराष्ट्राच्या राज्यभाषेला म्हणजेच मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. परंतु अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही राज्यात मराठी भाषा अधिक हाल सोसू लागली असल्याची उदाहरणं सातत्याने समोर येऊ लागली आहेत. एअरटेल गॅलरीतील एका उर्मट कर्मचाऱ्याने मराठी बोलण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता डीमार्टमधील कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. याप्रकरणी मनसेने वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने माफी मागितली. अंधेरी वर्सोवा येथील डी मार्ट येथे हा प्रकार घडला.
अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील डीमार्टमध्ये कर्मचारी आणि ग्राहकामध्ये हा वाद झाला. डीमार्टमधील कर्मचाऱ्याला ग्राहकाने मराठीत बोलण्याची विनंती केली. मात्र, त्याने मराठीत बोलण्यास नकार दिला. “मी मराठी बोलणार नाही, हिंदीतच बोलणार”, असं उद्धटपणे उत्तर त्याने दिलं. “मी मराठीतच बोलणार, तुला काय करायचं ते कर”, असं तो ग्राहकाला उर्मटपणे म्हणत होता. पण ग्राहक मराठी बोलण्यावर अडून राहिला. त्यावर “मी मराठीत नाही बोललो तर तू काय करणार? तुला काय त्रास आहे?” असं उलट उत्तर तो हिंदीतून देऊ लागला. “मला मराठी शिकवायला आला आहेस का?”, असंही त्याने विचारलं.
मनसेकडून शाब्दिक चोप
ज्या ग्राहकाबरोबर हा वाद झाला तो मनसेचा पदाधिकारी होता. त्यामुळे त्यांनी इतर पदाधिकाऱ्यांना बोलावून मनसे स्टाईल खळखट्याक केला. वर्सोव्याचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी अंधेरीतील डीमार्टमध्ये जाऊन त्या कर्मचाऱ्याला कडक शब्दांत समज दिली. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावंच लागेल. मराठी बोलता येत नसेल तर तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची, इथे यायचं नाही, असंही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
अंधेरीतील वर्सोवा येथे डीमार्ट कर्मचाऱ्याची मुजोरी, मराठी बोलण्यास दिला नकार; मनसेचे खळखट्याक#MNS #andheri #DMart pic.twitter.com/h7ZUdaCEXN
— Viral Content (@ViralConte97098) March 26, 2025
अखेर, प्रकरण चिघळत गेल्याचं लक्षात येताच डीमार्टमधील कर्मचाऱ्याने कानाला हात लावून माफी मागितली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून मराठी माणसाने या उर्मट कर्मचाऱ्यावर संताप व्यक्त केला आहे.