लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करावे आणि अंगणवाडी केंद्र ताब्यात घ्यावे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झाले असून संपासोबतच ‘रस्ता रोको’, ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांसाठी ३ जानेवारी २०२४ रोजी आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्यूईटी द्यावी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधन वाढवावे, निवृत्ती वेतन योजना लागू करावी, ताबडतोब मोबाइल द्यावा या मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. सलग महिनाभर सुरू असलेल्या या संपाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने अखेर अंगणवाडी सेविकांनी सावित्रीबाई फुले जयंती दिनी ३ जानेवारी रोजी आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा-आरे जंगलात सापडलेल्या बिबट्याच्या कातडीच्या फॉरेन्सिक तपासणीला सुरुवात

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या सर्वच संपामध्ये सहभागी झाल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. आहार वाटप बंद झाले असून लाभार्थी आहार व पूर्व शालेय शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे ही सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी सर्व अंगणवाड्यांमधील वस्तू व साहित्यांचे मोजमाप करून अंगणवाड्या ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याला अंगणवाडी कर्मचारी संघाने कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, अंगणवाडी कर्मचारी कर्तव्यात कसूर करत असतील तर त्यांना सेवेतून कमी करण्याच्या सूचना आयुक्तांनी १ जानेवारी रोजी दृश्यप्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीमध्ये दिल्या होत्या.

आयुक्तांच्या या निर्णयामुळे अंगणवाडी कर्मचारी संतप्त झाले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केल्यास आम्ही रस्तावर उतरून आंदोलन करू, तसेच गरज पडल्यास ‘रस्ता रोको’ही करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सचिव राजेश सिंग यांनी दिला.

आणखी वाचा-प्रसिद्ध चित्रपट कलाकार राकेश बेदी यांची सायबर फसवणूक

राज्यात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी

पोषण, शिक्षण, आरोग्य व संदर्भीय सेवा देण्याचे महत्त्वाचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. गेल्या ५० वर्षांपासून अंगणवाड्या कार्यरत असून, संपूर्ण राज्यात सुमारे दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांना १० हजार, तर मदतनीसांना ५५०० रुपये मानधन दिले जाते.

Story img Loader