मुंबई: गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपाचा मोठा फटका अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारापासून वंचित असलेल्या सुमारे ५८ लाख बालकांना तसेच जवळपास १० लाख गर्भवती महिला व स्तनदा मातांना बसत आहे. पुरेसा पोषण आहार मिळत नसल्यामुळे लाखो बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. गंभीर बाब म्हणजे तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढून (नवीन शासकीय भाषेत तीव्र कमी वजनाची बालके) ७८,४३७ एवढी झाली आहे.
राज्यात सुमारे ९३ हजार अंगणवाड्या असून दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत. तर या अंगणवाड्यांमध्ये आजघडीला ५८ लाखांहून अधिक बालके आहेत. ० ते सहा वर्षे वयोगटापर्यंतच्या या बालकांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार देण्यात येतो. तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य विषयक तपासणी केली जाते. या बालकांचे नियमित वजन करण्यात येऊन कुपोषित व तीव्र कुपोषित असे वर्गीकरण करून त्यानुसार अशा बालकांसाठी अधिकचा सकस आहार देण्यात येतो. सध्या अंगणवाडी सेविकांना १० हजार रुपये मानधन देण्यात येते तर मदतनीसांना साडेपाच हजार रुपये देण्यात येतात. अलीकडेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ग्रामीण भागात आरोग्याचे काम करणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात सात हजार व सहा हजार दोशने रुपये वाढीची घोषणा केली. यामुळे आमच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता आम्हालाही आशां प्रमाणे मानधनवाढ मिळावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी लावून धरत चार डिसेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले. अंगणवाडी सेविकांच्या या संपाचा मोठा फटका या अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार घेणाऱ्या ५८ लाख बालकांना बसत आहे. ही बालके पोषण आहारापासून वंचित असून महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार तसेच `टेक होम रेशनʼयोजना राबविण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरी ते तोकडे असल्याचे महिला व बाल विकास विभागाचे अधिकारीच मान्य करतात.
हेही वाचा… VIDEO: ग्रॅन्टरोड स्थानक इमारतीला आग; जीवितहानी नाही
अंगणवाडी सेविकांच्या या संपाचा फटका आधीच कुपोषित व तीव्र कुपोषित श्रेणीत असलेल्या बालकांना मोठ्या प्रमाणात बसला असून जी बालके कुपोषित श्रेणीमध्ये होती त्यातील अनेक बालके आता तीव्र कुपोषित श्रेणीत गेल्याचे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या संपामुळे आजघडीला ७८,४३७ बालके ही तीव्र कुपोषित श्रेणीत गेली असून ही संख्या जास्तही असू शकते असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय पोषण आहाराच्या लाभार्थी असलेल्या पाच लाख ४७ हजार २४७ गर्भवती महिला आहेत तर पाच लाख ४० हजार ४७२ स्तनदा माता आहेत.
महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून या सर्वांना पोषण आहार देण्यात येतो. यात सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना प्रतीदिन ५१४.९८ उष्मांक व २१.४० ग्रॅम प्रथिने असलेला आहार दिला जातो. तर गरोदर व स्तनदा महिलांना ६२१ उष्मांक व २६.९२ ग्रॅम प्रथिने असलेला आहार देण्यात येतो. त्याचप्रमाणे कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांना अनुक्रमे ३०९.३२ उष्मांक व १४.१७ ग्रॅम प्रथिने आणि ५३४.४६ उष्मांक व २०.३३ ग्रॅम प्रथिने असलेला अतिरिक्त आहार दिला जातो. याशिवाय या बालकांची आरोग्य तपासणी, लसीकरण तसेच पूर्व प्रथमिक शिक्षण आदी वेगवेगळे उपक्रम अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केले जाते. गेले ३९ दिवस अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे पोषण आहारापासून आरोग्य तपासणीपर्यंत सर्व कार्यक्रम ठप्प झाले. संप लांबत चालल्यामुळे तीव्र कुपोषित बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार असून परिणामी बालकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या आगामी काळात निर्माण होऊ शकते अशी भीती आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ व्यक्त केली आहे.
आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गर्भवती महिलांना पुरेसा पोषण आहार बाळाच्या व मातेच्या प्रकृतीचा विचार करता अत्यावश्यक आहे. अन्यथा जन्माला येणारे बाळ आरोग्याच्या गंभीर समस्या घेऊन जन्माला येऊ शकते अशी साधार भीती त्यांनी व्यक्त केली.
अंगणवाडी सेविकांनी संप मागे घ्यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच या संपाचा फटका बालके तसेच स्तनदा व गर्भवती महिलांना बसू नये, त्यांना पोषण आहार मिळावा यासाठी विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी आम्ही टेक होम रेशन देत आहोत. पोषण आहार मिळावा यासाठी ग्रामीण भागातील वेगवेगळ्या घटकांचे सहकार्य घेतले जात आहे. – अनुप कुमार यादव, सचिव महिला व बाल विकास विभाग.