गिरीश बापट यांच्या मध्यस्थीनंतर माघार
करविषयक विधेयकावर बोलू न दिल्याने संतप्त झालेले माजी मंत्री व राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सोमवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उपोषण सुरू केले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
आमदारांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सभागृहात गोंधळ झाला. या गोंधळातच पिठासीन अधिकारी योगेश सागर यांनी कामकाज रेटले. करविषयक विधेयक मांडण्यात आले असता जयंत पाटील यांनी बोलण्याची परवानगी मागितली, पण सागर यांनी लक्ष न दिल्याने पाटील हे अध्यक्षांसमोरील मेजापुढे गेले. तेथे त्यांनी सागर यांच्याशी हुज्जत घातली. तेव्हा बोलण्यास परवानगी दिली जाईल, असे सागर यांनी सांगितले. पण पाटील यांना बोलण्याची संधी नाकारल्याने ते संतप्त झाले आणि सभात्याग करून निघून गेले. बोलण्यास नकार दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उपोषण सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आवाहन आणि संसदीय कार्यमंत्री बापट यांनी पायऱ्यांवर येऊन केलेली विनंती यानंतर पाटील यांनी उपोषण मागे घेतले. नंतर सभागृहात आल्यावर पाटील यांनी पिठासीन अधिकारी योगेश सागर यांच्या वर्तनाबद्दल नापसंती व्यक्त केली.