लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : पत्नीला सरपंच पद न मिळाल्याच्या रागातून एकाने बिअरच्या बाटलीच्या काचेने डोळ्यावर मारून जखमी केले. तसेच, शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मोटार पाठीमागे घेत दुचाकीला ठोकरल्याची घटना खेड तालुक्यातील आहिरे येथे घडली.
नारायण रामचंद्र अहेरकर (वय ५५, रा. अहिरे, ता. खेड) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. त्यांनी महाळूंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन सखाराम तांबे (रा. आहिरे, ता. खेड) असे अटक आरोपीचे नाव आहे.
आणखी वाचा-बेशिस्त वाहतुकीचे पुणे परवाना चाचणीत ‘नापास’
अहेरकर यांची सून गेल्या चार वर्षापासून आहिरे गावच्या सरपंच आहेत. तर, तांबे याची पत्नी या ग्रामपंचायत सदस्या आहेत. सरपंच पदावरून अहेरकर आणि तांबे यांच्यात वाद आहेत. तांबे यांच्या पत्नीला सरपंच पद न मिळाल्याने त्यांना राग होता. अहेरकर हे रविवारी घरासमोर थांबले होते. यावेळी तांबे हा मोटारीतून आला. पत्नीला सरपंच पद न मिळाल्याच्या रागातून बिअरच्या बाटलीच्या काचेने अहेरकर यांच्या डोळ्यावर मारून जखमी केले. तसेच, शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मोटार पाठीमागे घेत अहेरकर यांच्या दुचाकीला धडक देऊन नुकसान केले. पोलीस हवालदार दिघे तपास करीत आहेत.