मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन लोकल रद्द केल्या शिवाय चुकीचे इंडिकेटर्स लावून प्रवाशांची दिशाभुल केल्यामुळे संतप्त झालेल्या मुंब्र्यातील प्रवाशांनी रेल रोको करून मध्य रेल्वेला हिसका दाखवला, परंतु त्याचा फटका मुंब्रा आणि कळव्यातील प्रवाशांना सहन करावा लागला. प्रवाशांच्या या आंदोलनामुळे सकाळी ९.५० ते १०.२० असा सुमारे अर्धातास या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. या वेळात धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवून रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला. त्यामुळे कळव्यातील प्रवाशांची पुरती गैरसोय झाली. सोमवारी सकाळी कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या दोन लोकल अचानक रद्द करण्यात आल्या होत्या.
मुंब्रा स्थानकात त्यामुळे मोठी गर्दी उसळली होती शिवाय त्याच वेळी स्थानकात चुकीचे इंडिकेटर्स लावण्यात आले त्यामुळे प्रवाशांच्या संतापात आणखी भर पडली. संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत त्यामुळे प्रवाशांनी रेल रोको करून आपला संताप व्यक्त केला. सुमारे अर्धातास मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील वाहतुक मुंब्रा ते कळवा दरम्यान बंद झाली होती. याचा फटका कळवा स्थानकातील प्रवाशांना सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाने ठाण्यातून कल्याण आणि टिटवाळ्याकडे जाणाऱ्या दोन लोकल त्यामुळे जलद मार्गावरून चालवल्या. या प्रकरणी कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलीसांनी दिली.

Story img Loader