मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते अनिल देसाई यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव फेटाळून लावली. देसाई यांच्या विजयाला आव्हान देताना कारवाई नेमकी कशासाठी करण्यात यावी याबाबत याचिकेत काहीच नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे, देसाई यांच्या खासदारकीला आव्हान देणारी निवडणूक याचिका ही नियमानुसार नसल्याचे स्पष्ट करून न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने ती फेटाळली.

हेही वाचा – छेडानगर जंक्शन अखेर वाहतूक कोंडीमुक्त

हेही वाचा – Mumbai Fire : लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीतून संशयाचा धूर, तिघांच्या मृत्यूचं कारण काय?

देसाई यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून तीन लाख ९५ हजार १३८ मते मिळाली. त्यांच्या खासदारकीला अधिवक्ता महेंद्र भिंगारदिवे यांनी आव्हान दिले होते. भिंगारदिवे यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. राईट टू रिकॉल पक्षाचे उमेदवार म्हणून भिंगारदिवे यांना एक हजार ४४४ मते मिळाली होती. मात्र, देसाई व निवडणूक लढविलेल्या इतर उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सदोष व अपूर्ण असल्याने ते अवैध ठरवून रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली होती. याशिवाय, या मतदारसंघातून त्यांना विजयी उमेदवार घोषित करण्याची मागणी केली होती. परंतु, संबंधित निवडणूक उमेदवारी अर्ज आणि उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांची छाननी केली होती. तसेच, त्यात कोणताही दोष आढळून न आल्याने ते स्वीकारले होते. यामुळे, अर्जातील कथित दोषांचे काय परिणाम झाले किंवा हे दोष, त्रुटी गंभीर स्वरूपाच्या होत्या आणि त्यामुळे उमेदवाराची सत्य माहिती जाणून घेण्याच्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केलेले नाही, असे न्यायालयाने भिंगारदिवे यांची याचिका फेटाळताना नमूद केले.