भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात “मला लोक म्हणतात पक्ष माझा, मी भारतीय जनता पार्टीची आहे. मात्र, पक्ष माझा नाहीये,” असं वक्तव्य केलं. यानंतर त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली. इतकंच नाही, तर पंकजा मुंडे नाराज असून पक्षांतर करतील, अशा चर्चांना उधाण आलं. याबाबत माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल देशमुख म्हणाले, “पंकजा मुंडे काय बोलल्या हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबत प्रस्ताव असेल तर त्या जिल्ह्यातील आमचे वरिष्ठ नेते धनंजय मुंडे आणि इतर नेते चर्चा करून निर्णय घेऊ शकतात.”

“…तर शरद पवार जिल्ह्यातील नेत्यांचं मत विचारात घेऊन निर्णय घेतील”

“अशाप्रकारची माहिती माझ्यातरी कानावर आलेली नाही. असा घटनाक्रम यापुढील काळात झाला तर शरद पवार त्या जिल्ह्यातील नेत्यांचं मत विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेतील”, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मध्य प्रदेशच्या प्रभारी पंकजा मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला लोक म्हणतात पक्ष माझा, मी भारतीय जनता पार्टीची आहे. मात्र, पक्ष माझा नाहीये. भारतीय जनता पार्टी खूप मोठा आहे. आम्हाला काही नाही मिळालं, तर मी जाईन ऊस तोडायला आणि महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला.”

“रासप माझ्या भावाचा पक्ष आहे. वडिलांशी भांडण झालं, तर मी भावाच्या घरी जाईन”, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी आज…”

दरम्यान, पंकजा मुंडे यांना २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यावरून बरेच राजकीय तर्क-वितर्क लावले जाऊ लागले होते. स्वतः पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजीदेखील व्यक्त केली होती. आता त्यांनी त्यांच्या मनातली खदखद पुन्हा एकदा मांडली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे याबाबत म्हणाले, पंकजा मुंडे यांनी असं बोलून दाखवलं असेल तर ही भूमिका एकट्या पंकजा मुंडेंची नाही. भाजपाचे महाराष्ट्रातील, तसेच देशातील असे कार्यकर्ते आणि नेते आहेत ज्यांची घुसमट होत आहे, त्यांची भूमिका त्यांनी मांडली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh comment on speculations of pankaja munde joining ncp pbs
Show comments