भ्रष्टाचाराच्या आरोपांत देशमुख सध्या कारागृहात

मुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जामीन द्यायचा की नाही याचा  निर्णय विशेष न्यायालय शुक्रवारी देणार आहे. या प्रकरणात जामीन मिळाल्यास देशमुख यांची कारागृहातून सुटका होईल. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांतही जामीन मिळविण्यासाठी देशमुख यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. या जामीन अर्जावरील देशमुख आणि सीबीआयचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला.

हेही वाचा >>> ‘पीएफआय’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पनवेलमधून अटक

दरम्यान, गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून गंभीर आर्थिक गंभीर गुन्हे केले. त्यामुळे ते जामीन मिळण्यास पात्र नाहीत, असा दावा सीबीआयने देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना विशेष न्यायालयात केला. देशमुख हे लोकप्रतिनिधी आणि नेते असून त्यांना तपासाच्या या टप्प्यावर जामीन मंजूर केल्यास ते उच्चस्तरीय राजकीय आणि प्रशासकीय संबंधांचा फायदा घेऊ शकतात. तसेच साक्षीदारांवर प्रभाव टाकण्यासाठी, तसेच पुरावे नष्ट करण्यासाठीही देशमुख हे आपल्या पदाचा दुरुपयोग करू शकतात. एवढेच नव्हे, तर ते देश सोडून पळून जाऊ शकतात, अशी भीती सीबीआयने देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना व्यक्त केली.

हेही वाचा >>> दिवाळीत मुंबई झगमगणार; सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन उच्च न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्यासह सहआरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे अंमलबजावणी संचलनालायानेही (ईडी) या आरोपांची चौकशी सुरू केली होती.

Story img Loader