मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्याची सीबीआयची मागणी विशेष न्यायालयाने शनिवारी फेटाळली. देशमुख यांची सीबीआयला आधीच पुरेशी कोठडी देण्यात आली आहे. तसेच वाढीव कोठडीसाठी सीबीआयने अर्जात दिलेले कारणही समाधानकारक नाही, असे स्पष्ट करून विशेष न्यायालयाने देशमुख यांना आणखी सीबीआय कोठडी देण्यास नकार दिला.
देशमुख यांच्यासह बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी सीबीआयने केवळ देशमुख यांनाच आणखी तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने सीबीआयची मागणी फेटाळून लावताना देशमुख यांच्यासह अन्य आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.