१०० कोटींच्या खंडणी प्रकरणी सध्या आर्थर रोड जेल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी अद्याप संपायचं नाव घेत नाहीयेत. एकीकडे सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांनी पैशांची मागणी केली नसल्याचा जबाब न्यायालयासमोर दिला असताना दुसरीकडे अनिल देशमुखांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ केली असून त्यामुळे अनिल देशमुख लवकर तुरुंगातून बाहेर येण्याच्या आशा मावळल्या आहेत. आता येत्या २७ डिसेंबरपर्यंत अनिल देशमुख यांचा न्यायालयीन कोठडीमधला मुक्काम वाढला आहे.

सचिन वाझे यांनी आज राज्य सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुखांनी १०० कोटींच्या खंडणीची मागणी केलीच नव्हती, असा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. आपण शहरातील बार किंवा हॉटेलच्या मालकांकांकडून किंवा त्यांच्या संबंधितांकडून कधीही पैसे गोळा केले नाहीत, असं देखील सचिन वाझेंनी चांदीवाल आयोगासमोर सांगितलं आहे.

या पार्श्वभूीवर सचिन वाझेंचा हा खुलासा म्हणजे अनिल देशमुख यांना त्यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपांबाबत क्लीनचिट असल्याचंच बोललं जात आहे. मात्र, दुसरीकडे अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यामुळे त्यांच्या अडचणी अद्याप संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत.

 “माजी गृहमंत्री अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचार्‍यांनी कधीही पैशांची मागणी केलेली नाही, असे सचिन वाझे यांनी सांगितले. तसेच मी शहरातील कोणत्याही बार मालकांकडून किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांकडून पैसे घेतलेले नाहीत,” असं वाझेंनी स्पष्ट केलं. यासंदर्भात फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिलंय.

दरम्यान, आपल्याला गुणवत्तेवर पुन्हा सेवेत घेण्यात आल्याचा दावा वाझेंनी सोमवारी केला होता. तसेच देशमुख यांचे स्वीय सहाय्यक (पीए) संजीव पालांडे यांनी त्यांच्याकडे कधीही आर्थिक मागणी केलेली नाही आणि ते त्यांना केवळ एकदाच अधिकृत कारणांसाठी भेटले होते, असे वाझे यांनी यापूर्वी त्यांच्या साक्षीत स्पष्ट केले आहे.

Story img Loader