राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीनं ५ वेळा समन्स बजावले आहेत. पाचवं समन्स मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी बजावलं होतं. आज त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, आज देखील अनिल देशमुख चौकशीसाठी ED समोर हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर नेमकी अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत आणि कधी होणार? याविषयी चर्चा सुरू असताना आज ईडीच्या कार्यालयात आलेल्या अनिल देशमुख यांच्या वकिलांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे वकिल इंदरपाल सिंग ईडीच्या कार्यालयात आले होते, त्यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
“आम्ही ईडीला काही काळ वाट पाहण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावं, अशी भूमिका मांडणारं पत्र आम्ही ईडीला दिलं आहे. तपासामध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आम्ही चौकशीसाठी हजर राहू”, असं इंदरपाल सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल येईपर्यंत अनिल देशमुख ईडीच्या समन्स आल्यानंतर देखील हजर राहणार नसल्याचंच त्यांच्या वकिलांनी सूचित केलं आहे.
An exemption application has been filed by Anil Deshmukh’s lawyer Inderpal Singh before Enforcement Directorate (ED).
— ANI (@ANI) August 18, 2021
अनिल देशमुख यांच्या हॉटेलवरही ‘ईडी’चा छापा
ईडीची छापेमारी…
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. नुकतेच ईडीनं अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले असून त्यांना १८ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.