मुंबई : दावोस दौऱ्यात ३ लाख ५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत आहेत. मागच्या दाओस दौऱ्यात अडीच लाख कोटी रुपयांचे करार झाले होते. मात्र त्यातील उद्योग प्रत्यक्षात राज्यात उभे राहिलेले नसून मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा जनतेची दिशाभूल करणारा प्रकार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी केली आहे.
गेल्या वर्षी दावोस दौऱ्यात अडीच लाख कोटी रुपयांचे करार झाले होते. त्यातून विदर्भासाठी ९० हजार कोटींची गुंतवणूक येणार होती. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात जे प्रकल्प येणे अपेक्षित होते, त्यांच्याशी करार होऊन जवळपास १५ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. पण, यातील एकही प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहिलेला नाही. करार केल्यानंतर कंपन्यांनी पुढे काहीच केले नाही. अनेक कंपन्या या मोठी गुंतवणूक करण्यासाठी सक्षम नसल्याचे समोर येत आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.
गडचिरोली येथील २० हजार कोटींच्या पोलाद उद्योगाला जागा मिळत नाही. वीज दराबाबत राज्य सरकार बोलायला तयार नसल्याने कंपन्या जमीन खरेदीस टाळाटाळ करत आहेत. सामंजस्य करारानंतर कंपन्या उभ्या राहत नसतील तर युवकांच्या हाताला काम कसे मिळेल, असा सवाल करत देशमुख यांनी केला. तसेच राज्य सरकारने मागच्या दावोस दौऱ्यातील करारांच्या सद्यस्थितीची माहिती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याचे फलित शून्य – आदित्य ठाकरे
मुंबई: गुजरात, तमिळनाडू सारख्या राज्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत कोटयवधी रुपयांचे औद्योगिक सामंजस्य करार केलेले आहेत पण ४० जणांच्या टोळीला घेऊन दावोस मध्ये गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातील फलित हे शून्य असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. गेल्या वर्षी झालेल्या करारातील अनेक कारखान्यांची साधी वीट रचली गेलेली नाही असे त्यांनी सांगितले.
राज्यात भेटणे शक्य असलेल्या उद्योगपतींची दावोस मध्ये भेट घेण्यात आली हे हास्यास्पद आहे. मुख्यमंत्र्यांची ही दावोस सहल होती. त्यासाठी ४० जणांची पर्यटक टोळी नेण्यात आली होती. त्यांना केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी दिली होती का असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यात सध्या ‘बदला’ घेण्याच्या भावनेचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे सूरज चव्हाण, राजन साळवी, रवींद्र वायकर यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे पण हे सर्वजण ठाकरे गटाशी एकनिष्ट आहेत. त्यांनी काही चुकीचे केले नाही. त्यामुळे ते शरण जात नाहीत, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.