अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये जाऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अनिल जयसिंघानीला मुंबईत आणण्यात आलं आहे. त्याला मलबार हिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडेही सुपूर्द करण्यात आलं आहे. तो ७२ तास चकवा कसा देत होता? त्याला पकडताना काय काय अडचणी आल्या हे सगळं मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल जयसिंघानी बऱ्याच वर्षांपासून फरार होता

अनिल जयसिंघानी हा बऱ्याच वर्षांपासून फरार होता. मुंबई पोलिसांनी पाच दिवसांचं सर्च ऑपरेशन राबवून त्याला अटक केली आणि मुंबईत आणलं. अनिल जयसिंघानी तांत्रिक बाबींची मदत घेऊन स्वतःचं अस्तित्त्व लपवत होता. मात्र मुंबई पोलिसांनी पाच दिवस शोध मोहीम राबवून अनिल जयसिंघानीला अटक केली. मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेची पाच पथकं तयार केली होती. ही पाच पथकं वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनिल जयसिंघानीचा शोध घेत होती. अनिल जयसिंघानीवर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये एकूण १५ गुन्हे दाखल आहेत.

महाराष्ट्रातून अनिल जयसिंघानी शिर्डीमागे गुजरातला गेला होता

तांत्रिक विश्लेषणात असं निदर्शास आलं की अनिल जयसिंघानी हा आरोपी महाराष्ट्रातल्या शिर्डीतून मग गुजरातला गेला. बार्डोली या ठिकाणी अनिल जयसिंघांनी होता. आम्ही तीन पथकं गुजरात राज्यात पाठवली. गुजरात राज्यातल्या सुरत पोलिसांनी, सुरत ग्रामीण पोलीस तसंच गोध्रा आणि इतर पोलिसांची मदत घेऊन अनिल जयसिंघांनीला पकडण्याची मोहीम राबवली. अनिल जयसिंघानी हा ७२ तास पोलिसांना चकवा देत होता. बार्डोलीत त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. तिथून तो निसटला. त्यानंतर तो सुरतला गेला. सुरतहूनही तो पळाला. त्यानंतर वडोदरा, भरूच या मार्गे गोध्रा या ठिकाणी पळून जात असताना त्याला अटक करण्यात आली अशी माहिती मुंबई पोलिसांनी थोड्याच वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गुजरात पोलिसांच्या मदतीने अनिल जयसिंघानीला आम्ही गुजरातच्या कलोलमध्ये अटक केली. या आरोपीकडून मोबाईल, एक कार, विविध उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जे अनिल सिंघानियाला मदत करत होते त्यांनीही ताब्यात घेण्यात आलं आहे. जी कार जप्त करण्यात आली ती महाराष्ट्रातली होती. अनिल जयसिंघानी हा लोकेशन लपवण्यात आणि पोलिसांना गुंगारा देण्यात तरबेज आहे असंही मुंबई पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे पोलिसांसमोर अनेक आव्हानं आली. पण मुंबई पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अटक केली. मलबार हिलचे तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात अनिल जयसिंघानी आणि त्याला सहकार्य करत असलेल्यांना देण्यात येतं आहे.

अनिल जयसिंघानी बऱ्याच दिवसांपासून गुजरातमध्ये राहात होता. त्याच्याकडे विविध कंपन्यांचे मोबाईल होते. तसंच विविध इंटरनेट उपकरणंही आहेत जी जप्त करण्यात आली आहेत. नेमका किती काळ तो गुजरातमध्ये राहात होता याचा सविस्तर अहवाल आम्ही तयार करतो आहोत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil jaisinghani evaded the mumbai police for 72 hours police told the whole sequence of events scj