मुंबई : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी झिशान सिद्दिकी यांनी आरोप केल्यानंतर पोलिसांच्या आरोपपत्रावर झिशानचे समाधान झाले नसेल किंवा काही वेगळा पैलू असेल तर सरकार त्यांचेच आहे. त्यांनी सरकारकडे तक्रार करावी आणि पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी करावी. त्यातून झिशानला माहिती असलेले सत्य बाहेर आणले पाहिजे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे) नेते आमदार अनिल परब यांनी केली.
ज्ञानेश्वर नगरच्या लोकांनी सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना तिथे बोलवले होते. या व्यतिरिक्त माझा कुठे उल्लेख नाही. ज्या ११ बिल्डरचा उल्लेख यात आहे त्यांची चौकशी करावी. ज्यात माझ्या माहितीप्रमाणे अदानींचे पण नाव आहे. बाबूलाल वर्मा, शिवालीक व्हेंचर, पृथ्वी चव्हाणचे नाव आहे. त्यांना चौकशीला बोलावून तपासून घ्या, असे परब म्हणाले. बाबा सिद्दिकींना कोणत्या गँगस्टरचे फोन येत होते, जे झिशानला माहिती होते, छोटा शकील याने त्याच्या वडिलांना धमकी दिली अशी बातमी मी दूरचित्रवाणीवर पाहिली होती. असे असेल तर संपूर्ण गुन्ह्याचा तपास सर्व अंगाने व्हायला हवा. छोटा शकीलने बाबा सिद्दिकींना धमकी दिल्याची बातमी येत होती. त्यामुळे त्याबाबतचीही चौकशी व्हावी, असे परब म्हणाले.