मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेली तक्रार रद्द करण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच याचिका प्रलंबित असेपर्यंत ईडीच्या कारवाईपासून अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली आहे.
व्यावसायिक भागीदार आणि सहकारी सदानंद कदम यांना ईडीने अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर परब यांनी अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परब यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दापोलीतील जमिनीची किंमत २.७४ कोटी रुपये असून गुन्ह्यांतून मिळालेल्या पैशांतून या जमिनीवर ७.४६ कोटी रुपयांचे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. कदम आणि परब या दोघांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर दोघेही चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले होते.